अखेर सफाई कर्मचारी पदे भरणार ठेकेदारामार्फतच

१६३३ पदे रिक्त ; मंजुर पदे ७०५४ असतांना भरतीला ब्रेक

0
नाशिक | दि.३० प्रतिनिधी- नाशिक महापालिकेच्या महापौर पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी सफाई कर्मचार्‍यांसह इतर पदांची भरतीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन असे सांगितले. मात्र पालक मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या नाशिक दौर्‍यात अतांत्रिक पदे भरली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे आता सफाई कामगारांसह इतर अतांत्रिक पदे महापालिकेला आऊट सोर्सिग म्हणजे ठेकेदारातून भरावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान महापालिकेत सद्या १६३३ विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे रिक्त असुन आता यातील निम्म्यापेक्षा जास्त पदांची कामे ही येणार्‍या काळात ठेकेदारामार्फत केली जाणार आहे.

राज्य शासनाने अलिकडेच तीन चार वर्षापुर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेतील स्वच्छता कर्मचारी, इतर अतांत्रिक पदांची भरती न करता ही कामे आऊट सोर्सिंगद्वारे भरली जावीत असे परिपत्रक काढलेले आहे. याच परिपत्रकांच्या आधारे सिंहस्थ कुंभमेळा काळात साधुग्राम व गोदाकाठ परिसरातील स्वच्छतेची काम तात्कालीन आयुक्त प्रविण गेडाम यांनी आऊस सोर्सिर्ंग पद्दतीने ठेकेदार कंपन्यांकडुन भरले होते.

यावेळी सत्ताधारी मनसेनेने हे कर्मचारी मानधनावर भरण्यात यावेत आणि यात स्थानिक भुमिपत्रांची भरती करावी ही मागणी आयुक्तांनी फेटाळली होती. असे असतांना महापौर भानसी यांनी महापौर पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर लगेच शहरातील अनियमित घंटागाडी व जागोजागी दिसणारे कचर्‍याचे ढिग लक्षात घेत शहरातील सफाई कामगारांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत तोकडी असल्याने आपण सफाई कर्मचारी भरतीसाठी राज्य शासनानकडे पाठपुरावा करु असे जाहीर केले होते. त्यानंतर ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)येथील महापौर परिषदेत देखील महापौर भानसी यांनी सफाई कामगार भरतीचा मुद्दा उपस्थित केला होता.
अलिकडेच केंद्र शासनाच्या देशातील स्वच्छ शहर अभियानातील स्वच्छ शहरांच्या क्रमांकाच्या यादीत नाशिकचा क्रमांक १५१ गेला. यात नाशिकककरांनी शहरात स्वच्छता व्यवस्थीत होत नसल्याचे परिक्षणात सांगितले होते. तसेच इतर स्वच्छेच्या काही मुद्द्यात नाशिकला कमी गुण मिळाले होते. यावेळी देखील महापौरांनी शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर काही दिवसांनी महापौरांनी रामकुंड परिसरात अचानक भेट देऊन स्वच्छतेचे वास्तव पाहिले होते.

या एकुणच पार्श्‍वभूमीवर शासनाकडे पाठपुरावा करुन निदान स्वच्छता कर्मचारी भरती करण्याचा आग्रह महापौरांनी धरला होता. मात्र रविवारी नाशिक दौर्‍यावर आलेले नाशिकचे पालक तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी महापौरांची मागणी स्पष्टपणे फेटाळली. केवळ तांत्रिक पदासाठी शासनाकडुन भरतीसाठी मंजुरी दिली जाईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सफाई कामगारांसह इतर अतांत्रिक पदे भरण्यास नकार दिला.

त्यामुळे आता शहराचे आरोग्य सांभाळण्यासाठी सफाई कर्मचार्‍यांसह अतांत्रिक पदांची भरती आऊट सोर्सिंगद्वारे म्हणजे ठेकेदारांमार्फत केली जाणार आहे. महापालिकेत गेल्या बारा तेरा वर्षात भरती झालेली नसुन केवळ न्यायालयाच्या आदेशानुसार सफाई कामगार व इतर अतांत्रिक पदाची भरती झालेली आहे. यानंतर दरवर्षी साधारण दोनशे ते अडीचशे कामगार सेवानिवृत्त झाले असुन आता आकडा १६३३ पर्यत गेला आहे. यात विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर शिल्लक असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर मोठा ताण पडला आहे.

याचा परिणाम शहर विकासावर देखील झाला आहे. त्याचबरोबर अनेक वर्षानंतर तात्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्या काळात कर्मचार्‍यांना १०० पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर अद्यापही हे काम झालेले नाही. म्हणुन सध्या महापालिकेत अनेक महत्वाची पदे प्रभारी म्हणुन सांभाळली जात आहे. या नवीन वर्षात पाच महिन्यात १३२ कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होत असुन सन २०१८ – १९ मध्ये रिक्त पदांचा आकडा अडीच तीन हजारापर्यत जाण्याची शक्यता आहे.

अशाप्रकारे महापालिकेतील अधिकारी – कर्मचारी सेवानिवृत्त होऊन रिक्त पदांचा आकडा वाढत चालला असतांना भरतीला मात्र राज्य शासनाने ब्रेक लागला आहे. आता येणार्‍या काळात महापालिकेच्या विविध विभागाची कामे ठेकेदार कंपन्यांकडुन केली जाणार असल्याने नागरिकांना चांगली सेवा मिळेल काय ? याचे उत्तर येणार्‍या काळात मिळणार आहे.

३१ मे रोजी ३९ जण होणार सेवानिवृत्त
महापालिकेतून दरवर्षी मे महिन्यातील ३० व ३१ तारखेला मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. गेल्या वर्षी ३१ मे रोजी ४० च्या वर कर्मचारी सेवानिवृत्त झाले होते. आता उद्या (दि.३१) रोजी महापालिकेतून ३९ अधिकारी – कर्मचारी सेवानिवृत्त होत असुन त्यांचा सत्कार महापौरांच्या हस्ते होणार आहे.

LEAVE A REPLY

*