नितीन आगे हत्येचा तपास सीबीआयकडे द्या

0

वडिलांसह विविध संघटनांची मागणी

जामखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे या युवकाची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून हत्या झाली असतानाही सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका झाली आहे. या घटनेचा तपास सीबीआयकडे देऊन अट्रॉसिटी कायदा कडक करावा, हलगर्जीपणा करण्यार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नितीन आगेच्या वडीलांसह आंबेडकरी पक्ष संघटना व भीमसैनिकांनी पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे या युवकाची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून हत्या झाली होती, असा मृताच्या नातेवाईकांचा आरोप आहे, तशी फिर्याद मृताचे वडील राजू आगे यांनी 29 एप्रिल 2014 रोजी जामखेड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर खून व अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविला होता. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.
हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना यातील साक्षीदार फितूर झाल्याने सबळ पुराव्याअभावी हत्या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले आहेत. यामुळे या हत्येचा तपास शासनामार्फत सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अट्रॉसिटी कायदा कडक करावा व या प्रकरणातील फितूर झालेल्या साक्षीदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी,
अट्रॉसिटी अ‍ॅक्ट दाखल करताना हलगर्जीपणा करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कडक कारवाई करावी, तसेच लवकरात लवकर या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करावी व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नितीनच्या वडिलांसह आंबेडकरी पक्ष संघटना व भीमसैनिकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांना दिले आहे.
निवेदनावर मृत नितीन आगे याचे वडील राजू आगे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, अ‍ॅड. अरुण जाधव, विकी सदाफुले, विकी घायतडक, सतीश साळवे, संतोष गव्हाळे, बाबा सोनावणे, शिवाजी साळवे, बापूसाहेब गायकवाड, मिलिंद भोसले, सनी सदाफुले, योगेश अब्दुले आदींसह तालुक्यातील भीमसैनिकांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

*