निसाका विक्रीला सभासद, कामगारांचा विरोध

0

निफाड। दि.1 प्रतिनिधी
नाशिक जिल्हा बँकेचे 105 कोटी रु. कर्ज व त्यावरील व्याज यामुळे जिल्हा बँकेने जप्त केलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीच्या प्रस्तावास संचालक मंडळाने मंजुरी दिल्याच्या पार्श्वभुमीवर निफाड सहकारी साखर कारखान्याचे कामगार व सभासद यांनी निफाड बैठक घेवुन या विक्री प्रक्रियेला तीव्र विरोध करणार असल्याचे जाहीर केले.

निसाका हा भाडेतत्वावर चालवण्यासाठी देण्याचे त्यावेळी सूतोवाच केले होते. त्यासाठी निफाड येथे ग्रामसमृद्धीच्या माध्यमातून कमिटी तयार केली होती. या कमिटीने वेळोवेळी सहकार मंत्र्यांची भेट घेवुन मार्गदर्शन घेतले होते. त्यानुसार सहकार मंत्र्यांच्या आदेशाने जिल्हा बँकेने मिटकॉन कन्सल्टंसी कडून कारखान्याच्या जंगम मालमत्तेविषयी अहवाल मागितला होता.

त्या अहवालाचा आधार घेत जिल्हा बँकेने निसाकाची विक्री करण्यासाठी प्रस्तावास मान्यता दिली आहे. यावेळी निसाका विक्री होवु नये याबाबतच्या सूचना निसाका कामगार युनियनचे संपत कडलग, बी.जी. पाटील, रतन वडघुले, बबन सानप, शिवाजी ढेपले, प्रमोद गडाख, हरिश्चंद्र भवर, माधव तासकर, चिंतामण सोनवणे, सुनील कुटे, जगन कुटे, प्रकाश सुराणा, रामनाथ केदार, भागवत भंडारे आदींनी मांडल्या.

जिल्हा बँकेने घेतलेल्या निसाका विक्री निर्णयाविरोधात जिल्हा बँकेचे निफाड तालुक्यातील संचालक यांची भेट घेणे, सहकार मंत्र्यांकडे या निर्णयाविरोधात अपील दाखल करणे, कायदेशीर लढाई लढण्यास तयार राहणे आणि या प्रयत्नांना प्रतिसाद न मिळाल्यास मोर्चाचे आयोजन करणे व भाडेतत्वावर कारखाना देण्यास बँकेला प्रवृत्त करणे असे ठराव या बैठकीत करण्यात आले.

सद्यस्थितीत निसाकाची मालमत्ता विक्री करण्यापुर्वी जप्ती अगोदर भविष्य निर्वाह निधी, आयुक्त विक्रीकर विभाग, तहसिलदार निफाड, बँक ऑफ बडोदा आदींनी कारखाना यंत्रसामुग्री जप्तीची नोटीस बजावली असुन ही यंत्रसामुग्री जप्त केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने ठरविले तरी कारखाना विक्रीसाठी हा मोठा अडसर ठरत आहे.

तसेच अवसायानात निघालेली कारखाने विक्री न करता भाडेपट्टयाने चालविण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेले असतांनाही जिल्हा बँकेने घेतलेल्या या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावेळी ग्रामसमृद्धीचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी निसाका सुरु करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. प्रकाश महाले, प्रमोद गडाख, सदाशिव खेलुकर, प्रभाकर टर्ले, रमेश भगुरे, माधव गिते यांनी मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*