अकोलेकरांचा हक्क डावलला तर खाली पाणी जाऊ देणार नाही : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा इशारा

0

अकोले (प्रतिनिधी) – धरणे आमच्याच तालुक्यात पुनर्वसनही आमच्याच तालुक्यात, धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन झाले पाहिजे. अकोले तालुक्यातील पाण्यावर तालुक्यातील जनतेचा पहिला हक्क असून हा हक्क डावलला तर पाण्याचा एक थेंबही खाली जाऊ देणार नाही. आज आम्ही जितक्या आंनदाने जलपूजन करतोय त्यापेक्षा अधिक आक्रमकपणे आंदोलन करू असा इशारा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी दिला आहे.

निळवंडे धरणाच्या जलपूजनप्रसंगी पिचड बोलत होते. धरणग्रस्त शेतकर्‍यांच्या हस्ते धरणाच्या पाण्याचे साडी, चोळी, खण, नारळ अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी आमदार वैभवराव पिचड, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, अ.ता.एज्यु.सोसायटी चे अध्यक्ष जे. डी. आंबरे , ज्येष्ठ नेते मीननाथ पांडे ,अ.सा.का.संचालक सुरेश गडाख, अशोक देशमुख ,राजेंद्र डावरे ,गुलाब शेवाळे, सुनील दातीर, कार्यकारी संचालक भास्कर घुले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरजाजी जाधव, सेक्रेटरी यशवंत आभाळे, युवक अध्यक्ष शंभू नेहे, विकास शेटे ,दूध संघाचे संचालक गोरक्ष मालुंजकर, रमेश जगताप आदी उपस्थित होते.

धरणग्रस्त विठल आभाळे, रामहरी आवारी, देविदास कोकणे, हरिभाऊ पथवे आदींच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी धरणग्रस्तांच्यावतीने मधुकरराव पिचड यांचा सत्कार करण्यात आला. पिचड म्हणाले की, शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या नावाखाली सरकारने विकास कामे थांबवली पण शेतकर्‍यांना कर्जमाफीचा फायदा झाला? राज्यातले हे सरकार शेतकरीविरोधी असून शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करीत आहे. 2019 च्या निवडणुकीत चले जावचा नारा देऊन हे सरकार हुसकावे लागेल. असेही पिचड म्हणाले.

आमदार वैभवराव पिचड म्हणाले की, धरणाचे काम पूर्ण झाले पण कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यासाठी शासनाने निधी द्यावा. धरणग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावावेत, सुप्रमा दिली पण निधी मात्र दिला नाही. असेही आ. पिचड म्हणाले. मीननाथ पांडे, विठ्ठल आभाळे ,गिरजाजी जाधव, मधू पिचड यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन यशवंत आभाळे यांनी केले. यावेळी विजय लहामगे, माधव वैद्य, दगडू कोकणे, अरुण गायकर, जनार्दन मोरे आदी उपस्थित होते.

निळवंडेचे श्रेय घेण्यावरून भांडणे – 
राज्यात व जिल्ह्यात निळवंडेचे श्रेय घेण्यावरून भांडणे चालू आहेत. अनेक अडचणीतून हे धरण पूर्ण झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले, तेव्हा कुणी त्यांच्या मदतीला आले का? धरणग्रस्तांना जमिनी मिळू नये म्हणून काही लोक कोर्टात गेले. बाळासाहेब थोरात सोडले तर कुणीही मदत केली नाही. अन् पाण्यावर हक्क सांगायला सगळेच पुढे. राज्यातले सरकारही गंमतीशीर आहे, लोकप्रतिनिधींचे हक्क काढून घेऊन धरणातील पाणी सोडण्यासाठी नियामक समिती सरकारने नेमली. यात कोण आहे? मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता,जलविद्युत प्रकल्पाचा अधिकारी, डॉडसन, निळवंडेचा ठेकेदार? आता यांना पाणी सोडण्याचा अधिकार सरकारने दिला आहे. पाणी हे आमच्या हक्काचे असून त्यावर आमचा पहिला अधिकार आहे. धरण भरल्यावर आनंद होतो पण त्यात बुडाला त्याच्या डोळ्यात मात्र पाणी असते. कालवा सल्लागार समितीचा हक्क कायम ठेवला पाहिजे नाहीतर हे पाणी विकले जाईल अन् तालुका उजाड व्हायला वेळ लागणार नाही. मी कुठल्याही कंपनीचा एजंट नाही, मी जनतेचा एजंट आहे. वेळ पडली तर पाण्यासाठी चाक बंद करू. असाही इशारा पिचड यांनी दिला.

मुख्य कालवे भूमिगत न्यावेत – 
निळवंडे धरणाचे मुख्य कालवे भूमिगत पद्धतीने न्यावे कारण तालुक्यातील शेतकरी मोठ्याप्रमाणावर विस्थापित झालेला आहे . बागायती जमिनी यामध्ये जाणार असल्याने कालवे भूमिगतच न्यावेत. अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी यावेळी केली. तसेच या धरणाला मधुकर जलाशय असे नाव द्यावे कारण या धरणासाठी पिचड यांचे मोठे योगदान असल्याची मागणी धरणग्रस्त शेतकर्‍यांच्यावतीने विठ्ठल आभाळे यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

*