मुंबई (वृत्तसंस्था)- मुंबई शेअर बाजारात काल तेजी राहिली. निर्देशांकानेे 16 हजार अंशांचा टप्पा ओलांडून विक्रम केला. तर निफ्टीही जवळपास 4 हजार 800 अंशांवर बंद झाला. टाटा मोटर्स, रिलायन्स कम्युनिकेशन्स व आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये तेजी राहिली.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 327 अंशांनी वाढ झाली व तो 16 हजार 16 वर बंद झाला. दिवसभराच्या कामकाजाच्या वेळेत तो 16 हजार 30 वरही गेला होता. त्याची किमान पातळी 15 हजार 793 इतकी राहिली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’मध्येही 103 अंशांची वाढ राहिली व तो 4 हजार 783 वर बंद झाला. कामकाजाच्या काळात तो 4790च्या उच्च पातळीवर तर 4679च्या किमान पातळीवर होता.
बीएसईच्या मिडकॅप इंडेक्स व स्मॉलकॅप इंडेक्समक्ये अनुक्रमे 2.31 व 2.38 टक्के तेजी राहिली. निर्देशांकात ज्या कंपन्या तेजीत राहिल्या त्यामध्ये टाटा मोटर्स, रिलायन्स कम्युनिकेशन्स, आयसीआयसीआय बँक, जयप्रकाश असोसिएट्स व स्टरलाइट इंडस्ट्रीजचा समावेश आहे. केवळ आयटीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
शेअर बाजाराने प्रारंभीक तेजी कायम राखली. विदेशी बाजारातूून मिळणार्या सकारात्मक संकेतांमुळेही देशी बाजार भक्कम राहिले. मेटल, रियल्टी व ऑटो सेक्टरच्या शेअर्समध्ये चांगली तेजी राहिली.
सव्वाबारा वाजता निर्देशांक 145 अंशांच्या वाढीसह 15 हजार 834 वर होता. निर्देशांकात फायद्यात चाललेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, जयप्रकाश असोसिएट्स, रिलायन्स कम्यूनिकेशन्स, भारती एअरटेल व टीसीएसचा समावेश होता. निर्देशांकातील केवळ 3 कंपन्या आयटीसी, हिंदुस्तान युनिलीवर व महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे शेअर नुकसानीत सुरू होते.
युरोपिय शेअर बाजारातील संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराने शुक्रवारी दुपारनंतर वेग घेतला होता. व चांगल्या वाढीसह बाजार बंद झाला होता. त्यानंतर सोमवारी सुरूवातीपासूनच बाजाराने तेजी घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. |