- शहरात डेंग्यूला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरांची तापसणी केली जात असून आतापर्यंत 45 हजार घरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 300 घरांत इडिस डासांचा वावर असल्याचे उघड झाले आहे.
अवकाळी पावसाने शहराला झोडपून काढले आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली आहेत. डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून धूरफवारणी केली जात असून इडिस डासांचा शोध घेतला जात आहे. प्रत्येक घरात जाऊन डासांचे जन्मस्थान असलेल्या पाण्याच्या टाक्यांत आबीटची गोळी टाकण्याची मोहीम आरोग्य विभागाने उघडली आहे. शहरासह उपनगरांतही ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. अवकाळी पावसामुळे डासांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी डास आढळलेल्या परिसरात जंतुनाशक फवारणी केली जाते. बसस्थानके, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी ही फवारणी केली जात असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी दिली.
पावसामुळे घराच्या छपरांवर, गाडीचे टायर, डब्यात साचलेल्या पाण्यात या डासांची निर्मिती होते. छपरावर साचलेले पाणी काढून टाकण्याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. शहरातील झोपडपट्टीत हे प्रमाण अधिक असल्याचे या तपासणीत आढळून आले. ते कमी करण्याचे मोठे आवाहन आरोग्य विभागासमोर आहे. केडगाव येथून या रोगास प्रारंभ झाला. या भागात मोठ्या प्रमाणात उपययोजना केल्या जात आहेत. |