माध्यमांना नेहमी चटपटीत बातम्यांचे आकर्षण असते. निगेटीव्ह बातम्या वाचल्याही जातात. असे असले तरी समाजात चांगले, विधायक घडणारे
समाजासमोर मांडलेच पाहिजे. सर्वांची ‘मॉर्निंग’ खर्या अर्थाने ‘गुड मॉर्निंग’ व्हायला हवी.
माध्यमांमध्ये बातम्यांसाठी वेगवेगळे बीट असतात. त्यासाठी पत्रकार असतात. समाजासमोर चांगले मांडण्यासाठी ‘एक पॉझिटीव्ह बीट’ हवे त्यासाठी स्वतंत्र पत्रकार हवा!
देशदूतच्या गेस्ट एडिटर
उपक्रमात सहभागी झालेल्या
मान्यवर महिलांनी हा विचार रेटून आणि सुस्पष्ट भाषेत मांडला. त्यावर तेथे उपस्थित ‘देशदूतच्या’ सर्व संपादकीय विभागाने आपसूक टाळ्या दिल्यात. पारंपारिक विचारांना छेद देणारी कल्पना या मान्यवर महिलांनी मांडली, त्यावेळी संपादकीय विभागाला खर्या अर्थाने ‘वॉर रुमचे स्वरुप आले’.
उद्या शुक्रवारी (दि. ८ मार्च) जागतिक महिला दिन आहे. त्यामुळे शुक्रवारचा ‘देशदूत’ चा अंक मान्यवर महिलांच्या नेतृत्वात आणि ‘गेस्ट एडिटर’ या उपक्रमात काढण्याचे निश्चित झाले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ‘देशदूतच्या’ एम.आय.डी.सी. कार्यालयात पोहोचल्या सहा मान्यवर महिला. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष श्री.अशोक जैन यांच्या पत्नी सौ. ज्योतीभाभी जैन, जळगावमधील नवजीवन सुपरशॉप मालकीचे संचालक श्री.अनिल कांकरीया यांच्या पत्नी सौ. कंचन कांकरीया, जगप्रसिध्द विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या पत्नी सौ. ज्योती निकम, रायसोनी गृप ऑङ्ग एज्युकेशनल इन्स्टिट्युटचे संचालक श्री.प्रीतम रायसोनी यांच्या पत्नी सौ.राजूल रायसोनी, सुपरशॉपी महाप्रदर्शन मालिकेचे संचालक श्री. रवी जोशी यांच्या पत्नी सौ. ज्योती जोशी यांचे संध्याकाळी ६ ला गेस्ट एडिटर म्हणून देशदूतमध्ये आगमन झाले. ‘देशदूत’च्या उद्याच्या (दि. ८) अंकात प्रसिध्द होणारा मजकूर आपण निश्चित करायचा आहे? असे सर्व मान्यवर महिलांना सांगितल्यावर त्या आनंदून गेल्या. एक दिवसाचे संपादक ही कल्पना सर्वांना भावली आणि चर्चेचे विषय सुरु झाले.
‘महिलांचा विकास’ याच पॉप्युलर विषयाला स्पर्श करीत चर्चेला प्रारंभ झाला. शीतल उगले यांनी स्वानुभव सांगत महिलांचा विकास घरातून आणि समाजातून एकमेकांप्रती प्रेम आणि विश्वासातून होईल. यासाठी सर्व क्षेत्रातील महिलांच्या मागे उभे रहायला हवे. महिलांचा विकास प्रत्येक घराचा, देशाचा आणि जगाचा विकास समजला जावा. महिला या उत्तम प्रशासक असतात, असे त्या ठासून म्हणाल्या.
शीतल उगले यांच्या सुस्पष्ट मांडणीला सर्वांनीच टाळ्यांची दाद दिली. चर्चेचे सूत्र पकडून ज्योतीभाभी म्हणाल्या की, कुटूंबात पुरुष आणि महिलांमध्ये सामंजस्य हवेच. महिलांच्या चांगल्या कामाला दाद दिली जावी.
चर्चेच्या सुरात सूर मिसळत ज्योती निकम म्हणाल्या की, महिलांनी कशाचीही अपेक्षा करु नये. आपसात सामंजस्य हवे. पुरुषांनी पुरुषांची कामे करावी. महिलांनी घराचे काम नेटकेपणे सांभाळावे. आता शहरी आणि ग्रामीण महिला भेद नाही. ग्रामीण मुली आज मोबाईल वापरतात, इंटरनेट पाहतात, टि.व्ही.वर सर्व माहिती मिळते. त्यामुळे त्या सुध्दा हुशार झालेल्या आहेत. त्यांना त्यांची जबाबदारी समजते. अशा वेळी घरच्यांनी मुलींना, सुनांना ‘सपोर्ट’ करावा.
या चर्चेला थोडी कठोरपणाची किनार ज्योती जोशी यांनी दिली, त्या म्हणाल्या की, सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या सोबत आहेत. तरीसुध्दा काही कामात परंतु (बट) हा शब्द वापरुन महिला वेगळी असल्याची जाणीव करुन दिली जाते. हे चुकीचे आहे. महिला एका उंचीवर पोहोचल्या की त्यांनी ‘महिलापणाच्या’ कुबड्या ङ्गेकाव्यात.
ज्योतीभाभी म्हणाल्या, हेच खरे आहे ! आपण का इतरांपेक्षा स्वतःला कमी मानावे? तसे नकोच.
महिलांच्या विकासाबाबत कंचन कांकरीया म्हणाल्या, महिलांचा विकास घरातून होतो. पुरुषांनी त्यांच्या कामाबद्दल, व्यवसायाबाबत घरात चर्चा केली की, महिलांना प्रश्न समजतात. त्यांना निर्णय घेता येतात. एक गोष्ट मात्र महिलांनी नेहमी पाळावी. मर्यादीत संयम ठेवावा. प्रश्न हाताबाहेर जाणार नाही. याची काळजी घ्यावी.
महिलांच्या सन्मानाचा मुद्दा चर्चेत असतांना राजूल रायसोनी यांनी अगदी वेगळा विषय मांडला. त्या म्हणाल्या की, सध्या दिवसांमध्ये असा एकही दिवस नाही की, महिलांशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. रोजच महिलांना काम करावे लागते व सहभागी व्हावे लागते. जागतिक महिला दिनामुळे महिलांच्या आदराचा एक दिवस निश्चित साजरा होतो. तो आनंद देणाारा आहे. महिलांना कोणाची ‘सिम्पथी’ नको त्यांच्यात क्षमता आहे. त्या स्वतः सक्षम आहेत.
नात्याला तडा देणारी समानता नकोच! चौकट-
महिलांना पुरुषांच्या बरोबरीने किती समानता हवी? किती स्वातंत्र हवे? या प्रश्नावर शीतल उगले म्हणाल्या की, स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत निसर्गाने दिलेल्या काही बाबी वेगळ्या आहेत. त्यामुळे परस्परावरील प्रेम-विश्वास हवाच. समानता आणि स्वातंत्र्य मिळवितांना नात्याला तडा देणारी कोणतीही गोष्ट नकोच ! |