शहरावर सायंकाळच्या सुमारास घिरटया घालणारे विमान कोसळल्याच्या अफवेने नंदुरबारात मोठी खळबळ उडाली. ही अफवा असली तरी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थातील सर्वच घटक अफवास्थळी दाखल झाले आणि मार्च महिन्यातच एप्रिलफुलची अनुभूती जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेसह संपुर्ण नंदुरबारकरवासीयांनी अनुभवली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरात आज सायंकाळी ४.३० च्या सुमारास विमानाचा जोरदार आवाज आला. त्यामुळे अनेकांनी घराबाहेर येवून पाहिले असता एक विमान जमिनीपासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर घिरटया घालत होते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच इतक्या जवळून विमान जात असल्याने आणि विमानाच्या मागील बाजूने धूर निघत असल्याने बघ्यांनी हे विमान अपघातग्रस्त असल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे सदर विमानाचा अपघात झाला अशी चर्चा क्षणार्धात वार्यासारखी शहरासह जिल्हाभर पसरली. तर दुसरीकडे या घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी अनेकांनी शहरातील वृत्तपत्र कार्यालय, पत्रकार तसेच पोलीसांना दुरध्वनीद्वारे संपर्क केला. त्यामुळे सुमारे दोन तास वृत्तपत्र कार्यालयातील दुरध्वनी, मोबाईल खणखणत होते.
या घटनेचे गांभीर्य ओळखून आणि अनेक प्रत्यक्षदर्शींनी अपघातग्रस्त विमान शोधण्यासाठी सर्वांनीच हालचाली सुरु केल्या. हे विमान प्रकाशा आणि शहादा शहराच्या दिशेने गेले असल्याने अनेकांच्या गाडया या गावांच्या दिशेने वळाल्या. दरम्यानच्या काळात हे विमान समशेरपूर, प्रकाशा, डामरखेडा, नांदरखेडा, कुकरमुंडा, सावळदा, शिरुड या गावांमध्ये कोसळल्याच्या अफवांना पेव फुटले. त्यातल्या त्यात हे विमान समशेरपूर गावातच कोसळल्याची माहिती जिल्हा प्रशासन यंत्रणेला मिळाल्याने त्यांचा फौजफाटादेखील समशेरपूरकडे वळाला. विमान कोसळल्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजय अपरांती स्वतः पोलीस उपअधीक्षक श्री.गुंजाळ, पोलीस निरीक्षक रमेश पवार, राजेंद्र रायसिंग, शिरसाठ, संभाजी सावंत, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी ऍम्ब्युलन्ससह अफवास्थळी दाखल झाले. मात्र, या ठिकाणी अशाप्रकारची कुठलीही घटना घडली नसल्याचे कळताच एकच हास्यकल्लोळ उडाला.
यानंतर घटनास्थळी जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरीया हेदेखील दाखल झाले. त्यांनी आणि पोलीस अधीक्षक डॉ.संजय अपरांती यांनी परिसरातील सर्व अधिकार्यांशी चर्चा करुन असा विमान अपघाताचा कुठलाही प्रकार आपल्या क्षेत्रात घडला नसल्याची खातरजमा केली. मात्र, तोपर्यंत जिल्हाभर या अफवेचे पेव पसल्याने गावागावात विमान अपघाताचीच चर्चा सुरु झाली. रात्री उशिरापयर्ंत जिल्हयातील अनेक गावांमध्ये अशाप्रकारे विमान दुर्घटना झाल्याचे वृत्त सातत्याने येत होते. ही विमान दुर्घटनेची बातमी अफवा ठरली असली २३ दिवसांनंतर येणार्या एप्रिल फुलची अनुुभूती जिल्हा प्रशासनासह संपुर्ण नंदुरबारकरांना अनुभवयास मिळाली. मात्र, या घटनेने जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किती तत्पर आहे याची प्रचितीही यानिमित्ताने पहावयास मिळाली. |