|
|
|
|
| मुख्य पान | ‘ते’ ४८ अपंग कर्मचारी धुळे वैद्यकीय मंडळाकडून अपात्र |
| ‘ते’ ४८ अपंग कर्मचारी धुळे वैद्यकीय मंडळाकडून अपात्र |
|
| राकेश कलाल नंदुरबार, दि.७ -(13-May-2013) |
Tags : Dhule,Nandurbar |
जिल्हा शल्य चिकित्सकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिलेल्या जिल्हा परिषदेच्या ४८ अपंग कर्मचार्यांना धुळे येथील वैद्यकीय मंडळाने पडताळणीत बोगस ठरवले आहे. तर दोन खर्याखुर्या अपंग कर्मचार्यांना मात्र शुन्य टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेवून नोकरीला लागलेल्या अशा अपंग कर्मचार्यांंवर बडतर्फीची टांगती तलवार आहे.
आंध्रप्रदेश सरकारने स्विकारलेल्या धर्तीवर अपंगांना द्यावयाच्या दाखल्यासंदर्भात विकसीत केलेले सॉफ्टवेअर राबविण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. त्यासाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र संगणक आज्ञावलीद्वारे वितरीत करण्यासाठी दि. ३ डिसेंबरपासून राज्यभरात वापरण्यासाठी शासनाने ठरविले आहेत. महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने अपंग कर्मचार्यांसंदर्भात अपंग उमेदवारांची वैद्यकीय पडताळणी संगणकीकृत करावी, असे निवेदन सादर केले होते. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सदर सॉफ्टवेअर प्रणाली कार्यान्वित झाल्याने त्याठिकाणी दि.२९ नोव्हेंबर व १ डिसेंबर २०१२ अशा दोन दिवस अपंग उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी तारखा देण्यात आल्या होत्या. नंदुरबार येथील जिल्हा परिषद कार्यालयांतर्गत असलेल्या विविध विभागांमध्ये एकुण २०६ अपंग कर्मचारी आहेत. या सर्व अपंग कर्मचार्यांची अपंगत्व पडताळणीसाठी धुळे येथील वैद्यकीय मंडळाकडे पाठविण्यात आले होते. यात २० कर्मचारी तपासणीच्यावेळी गैरहजर होते तर ३९ कर्मचारी हजर राहूनदेखील त्यांची तपासणी होवू शकलेली नव्हती. त्यामुळे उर्वरित १४७ अपंग कर्मचार्यांचा पडताळणी अहवाल जिल्हा परिषदेला नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार ९९ कर्मचार्यांना ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आढळून आले आहे. त्यामुळे ते पात्र अपंग कर्मचारी ठरले आहेत. तर ४० टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्व असलेले तब्बल ४८ अपंग कर्मचारी बोगस आढळून आले आहेत. यातील दोन खर्याखुर्या अपंग कर्मचार्यांना मात्र वैद्यकीय मंडळाने कुठलेही अपंगत्व नसल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. नंदुरबार पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी राईबाई बारकू भोई यांचे दोन्ही पाय लहान मोठे आहेत. त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी ४५ टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. तर लोणखेडा ता.शहादा येथील जि.प.शाळेचे केंद्रप्रमुख लिलाधर गजमल देसले यांच्याकडे कर्णबधीर असल्याचे प्रमाणपत्र आहे. या दोन्ही कर्मचार्यांना कुठलेही अपंगत्व नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याने जिल्हा परिषदेने त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. धुळे वैद्यकीय मंडळाच्या या अहवालामुळे ४८ अपंग कर्मचार्यांवर बडतर्फीची टांगती तलवार आहे.
दरम्यान, सर्व अपंग कर्मचार्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले आहेत. या प्रमाणपत्रामुळे नोकरीसह अपंगत्वाबाबतचे विविध लाभ मिळत आहेत. मात्र, या अपंग कर्मचार्यांना धुळे वैद्यकीय मंडळाने अपात्र ठरविल्याने शल्य चिकित्सकांच्या या प्रमाणपत्राबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रमाणपत्र देतांना चिरीमिरीचा व्यवहार झाल्याचेच यावरुन दिसून येत आहे. याबाबत संबंधीत वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घेवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. |
प्रिंट काढा |
|
|
|