नाशिकरोड । दि. 7 प्रतिनिधी- मोकळ्या भूखंडावर असलेले अतिक्रमण काढून तो रिकामा करावयाचा असेल तर आम्हाला 11 लाख रुपये द्यावे, अशी मागणी प्रभाग समितीचे सभापती पवन पवार याच्यासह इतर साथीदारांनी एका व्यापार्याकडे केल्याने सदर घटनेप्रकरणी त्या व्यापार्याने नाशिकरोड पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांच्या या तक्रारीनुसार पोलिसांनी पवन पवार व त्याचा भाऊ विशाल यांच्यासह आणखी तिघा जणांविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, विजयकुमार शांतीलाल तोतला (55), रा. मध्यवर्ती कारागृहासमोर, ईश्वर कृपा सोसायटी, फ्लॅट नं. 9, जेलरोड, नाशिकरोड या व्यापार्याचा जेलरोडवरील मॉडेल कॉलनी परिसरात 700 वाराचा मोकळा प्लॉट आहे. हा प्लॉट पवन पवार व त्याच्या साथीदारांना विकत घ्यावयाचा होता. त्यासाठी पवन व त्याचा भाऊ विशाल यांनी तोतला यांना आपल्या कार्यालयात दि. 28 जानेवारी रोजी बोलावून घेतले. सदरचा प्लॉट आम्हाला विकत घ्यावयाचा असून पाहिजे त्या किमतीत आम्हाला द्यावा, असे म्हणून तोतला यांना धमकावले. यावेळी टेबलवर रिव्हॉल्व्हर ठेवण्यात आले होते. तोतला हा प्लॉट देणार नसल्याचे समजताच त्या प्लॉटवर अतिक्रमण करून शेड बांधण्यात आली. त्यानंतर हे शेड व अतिक्रमण काढावयाचे असेल तर आम्हाला 11 लाख रुपये द्या, अशी मागणी पवन व विशाल पवार यांच्यासह नितिन बर्वे, संतोष कुशारे, ओमप्रकाश बाहेती यांनी तोतला यांच्याकडे केली.
अखेर त्यांच्या धमकीला वैतागून तोतला यांनी नाशिकरोड पोलीस स्थानकात वरील पाचही जणांविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या या तक्रारीनुसार पोलीसांनी या सर्वांविरूद्ध भादंविक 386, 437, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि. एम.एम. बागवान, स.पो.नि. मुकुंद देशमुख हे करीत आहेत.
दरम्यान या घटनेप्रकरणी पोलीसांनी रात्री उशीरा संतोष कुशारे व नितिन बर्वे यांना अटक केली आहे. तर इतर दोन आरोपी फरार असून पवन पवार यापुर्वीच्या गुन्ह्यात अद्यापही कारागृहात आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांत पवन पवार व त्याच्या साथीदारांविरूद्ध हा तिसरा गुन्हा दाखल झाला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
|