Marathi News Paper
Updated on May 22, 2013, 00:17:44 hrs




Fro additional techical assistance

+91 9889748131
+91 9371252322
मुख्य पान | नाशिकमधील साधू-महंतांची एकमुखी मागणी साधूग्रामसाठी 300 एकर जागा मोकळी करा
नाशिकमधील साधू-महंतांची एकमुखी मागणी साधूग्रामसाठी 300 एकर जागा मोकळी करा
nashik(13-May-2013)
Tags : Nashik,sadhu gram, demand for land, political
 

नाशिक । दि.7 प्रतिनिधी- नाशिकमध्ये सन 2015-16 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधूग्रामसाठी 300 एकर जागा कायमस्वरुपी आरक्षित करावी ही सन 1990 पासूनची मागणी अद्यापही शासनाने पूर्ण केलेली नाही. त्यामुळे प्रथम साधुग्रामसाठीची जागा आरक्षित करा आणि नंतर इतर कामे करा, अशी एकमुखी मागणी महानगरातील साधू-संत व मंहतांनी केली. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधानकडे यायला तयार आहोत, असे सांगत संत-महंतांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. महापौर अॅड. यतीन वाघ यांनी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासंदर्भात आज साधू-संत व महंतासमवेत पहिली बैठक घेतली. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त संजय खंदारे, संत-महंत, महापालिका पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने 2505 कोटी रुपयांचा विविध कामांचा आराखडा राज्य शासनास सादर केल्याचे सांगून कामांसदर्भातील माहिती बैठकीत दिली. राज्य व केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून जसजसा निधी मिळेल, तसा कामांना वेग देण्यात येईल. त्याचबरोबर गेल्या कुंभमेळ्यात घडलेली चेंगराचेंगरीची दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी चांगले नियोजन केले जाणार आहे. यंदाचे वर्ष हे गोदवारी प्रदूषण मु्नती वर्ष पाळले जाणार असल्याने याअंतर्गत अनेक कामे सुरू झाली असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत गोदावरी प्रदूषणमुक्त होईल. कुंभमेळ्यासाठी साधूग्राम व इतर नियोजित कामांसंबंधी काही सूचना असल्यास त्याचा यात अंतर्भाव केला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. सन 1990 पासून तपोवनात साधुग्रामसाठी कायमस्वरुपी जागा आरक्षित करावी अशी मागणी केली जात असून अद्यापही ती प्रलंबित आहे. महंत श्रीचरणदास महाराज यांनी याबद्दल खंत व्यक्त करीत आता जागा कशी उपलब्ध करणार ते सांगा? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात 650 खालसे सहभागी होणार आहेत, गेल्या वेळेस तपोवनाच्या उत्तरेस तिगरानिया कंपनीपर्यत खालसे गेले होते, त्या ठिकाणी आता बांधकामे झाल्याने तिकडे कोणी जाणार नाही, त्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी काय करणार हेे प्रशासनाने सांगावे, अशी मागणी महंतांनी केली. त्यावर महापौरांनी जागा संपादन करण्याचे अथवा त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य व केंद्र शासनाची असून सध्या 57 एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून उर्वरित जागेसंदर्भात कलम 37 (1) अंतर्गत झोन बदलासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. जागांचे आरक्षण व निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार असून यासाठी आमच्या सोबत तुम्हीही मुंबई व दिल्लीला जाण्याची तयारी ठेवावी असेही महापौरांनी स्पष्ट केले. महंत श्रीचरणदास महाराज, स्वामी संविदानंद सरस्वती, महंत रामसेनदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, महंत रघुनंदनदास महाराज, नृत्यगोपाल महाराज, शोभादास महराज, शामदास महराज, विश्वंभरदास महाराज, नंदराज महाराज, टिकमदास महाराज, अंबादास महाराज, कमलदास महाराज, सितारामदास महाराज यांच्यासह संत महंतांनी साधूग्रामच्या जागेसाठी आम्ही मुंबई व दिल्लीपर्यत तुमच्यासोबत यायला तयार असल्याचे स्पष्ट करीत शासनाने अगोदर जागेचा प्रश्न कायमस्वरुपी सोडावा अशी मागणी केली. गेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली, हा प्रकार प्रशासन, पोलीस यांच्यात समन्वय नसल्याने घडला. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलीस यांच्यात समन्वय हवा, असेही एका महंताने सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सिंंहस्थ कुंभमेळ्याची जी समिती नियु्नत केली, त्यात साधूसंताचा समावेश नसल्याबाबत महंतांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कुंभमेळ्यासाठी मेळा अधिकार्‍यांची नियुक्त करावी, अशी मागणी केली. पुरोहित संघांचे अध्यक्ष सतीश शु्नल यांनी सांगितले की, कुंभमेळ्याची तयारी ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून उज्जैन येथे आपल्यानंतर कुंभमेळा असतांना त्यांच्याकडे कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे येथील कामांना शासनाने वेग दिला पाहिजे. डॉ. प्रमोद बैरागी यांनी आरक्षित जागा खासगी शिक्षण संस्थांना कशी दिली, अशाप्रकारे जागा कोणत्याही खाजगी संस्थांना देऊ नये असे सुचविले. त्यावर महापौरांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान जागा रिकामी करून घेतली जाईल असे स्पष्ट केले. तसेच लवकरच तपोवनातील साधूग्राम जागेची पाहणी साधू, संत-महंतासोबत केली जाणार असून त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ घेऊन त्यांच्यासोबत जागा आरक्षण व निधीबाबत चर्चा केली जाणार असल्याचेही महापौरांनी शेवटी सांगितले. या बैठकीस सभागृह नेते शशिकांत जाधव, विरोधी पक्षनेते सुधकार बडगुजर, मनसेनेच्या गटनेत्या सुजाता डेरे, कॉंग्रेस गटनेते लक्ष्मण जायभावे, भाजपा नेते संभाजी मोरूस्कर, राकॉं. गटनेते विनायक खैरे, शहर विकास आघाडी गटनेते गुरमित बग्गा, माकपा गटनेते अॅड. तानाजी जायभावे, दामोदर मानकर, शैलेश ढगे, उपायुक्त डी. टी. गोतीसे, शहर अभियंता सुनील खुने, कार्य. अभियंता चव्हाणके, धर्माधिकारी, हेमंत तळाजिया, दत्तात्रेय भानोसे, अलोक गायधनी, चंद्रशेखर परदेशी, रवींद्र देव, कृष्णकुमार नेरकर, कैलास यंदे, निलेश भोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.


प्रिंट काढा