पाथर्डीफाटा । दि. 7 वार्ताहर- आज विज्ञानाच्या सहाय्याने अनेक महिलांनी उंच भरारी घेतली आहे. देशाचे नाव उज्ज्वल करून अनेक संशोधनातून नवनवीन वाटा शोधून काढलेल्या असल्यातरी आजच्या विज्ञान युगात काही समाज व महिलांच्या पदरी आजही दारिद्रय खितपत पडलेले आहे. त्या दास्यातून त्यांची सुटका होईल या अपेक्षेवरती त्या जीवन कंठीत आहेत. भविष्यात आपल्याला शासनाकडून मदत मिळेल आपलेही मुलं शिकतील, मोठी होतील, अधिकारी बनतील अशी स्वप्न उराशी बाळगून दगडाला घडवून दुसर्यांच्या जीवनात जेवणातून स्वादीष्ट भोजन देण्यासाठी वरवंटा-पाटा घडवणार्या या महिलांचे जीवन आजही उपेक्षितच आहे.
पाथर्डीफाटा, इंदिरानगर, उपनगर, सातपूर, औरंगाबादनाका आदी ठिकाणी बोईवाडी, जिल्हा बडवाणी, मध्यप्रदेश या ठिकाणाहून आलेली ही कुटुंबं दिवसागणिक एकेक पाटा-वरंवटा, उखळ बनवून प्रतीनग 200 रूपये पर्यंत विकून आपला उदर निर्वाह चालवत आहे. मिळणार्या मूल्यामध्ये पूर्ण कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने लहानग्या मुला-मुलींनासुद्धा शाळा सोडून काम करावे लागत असल्याचे भगवती ठाकूर गट्टीवाल, गंगा लालू सिलावट, लक्ष्मी प्रेमसिंग सिलावट आदी महिलांनी आपली राम काहाणी सांगितली. आम्हास वास्तव्यास छप्पर मिळाले, दोन वेळचे जेवणासाठीचा रोजगार मिळाला तर आमच्याही जीवनात आनंद फुलेल शासनाच्या सोयी सुविधांचा आम्हापर्यंत लाभ झाल्यास त्याचाही परिणाम आमच्या जीवनावरती दिसल्या शिवाय रहाणार नाही. या भोळ्या आशा मेहनत करणार्या या महिलांना लागल्या आहेत. आज ठिकठिकाणी महिलांचे हार-तुरे फुले बुके देवून मोठ मोठी भाषणे ठोकून कौतुक केले जाईल. परंतु दारिद्रयात जीवन जगत असलेल्या गंगा, भगवती, लक्ष्मी अशा सारख्या अनेक महिलांच्या जीवनातसुद्धा एखादे फुल देवून कुणीतरी सत्कार करणारा निर्माण होईल का असा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांना पडावयास पाहिजे. तरच खर्या अर्थाने आजचा जागतिक महिलादिन साजरा केल्याचे सार्थक होईल.
|