- सलग तीन मासिक सभा घेण्यात कसूर केल्याच्या कारणावरून कर्जतच्या सरपंच सौ. सुनंदा अंबादास पिसाळ व उपसरपंच दादासाहेब अर्जुन सोनमाळी यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे कर्जतमध्ये खळबळ उडाली आहे.
कर्जतची ग्रा. पं. नगर जिल्ह्यात सर्वात मोठी म्हणून सुपरिचित आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून सौ. सुनंदा पिसाळ या सरपंच म्हणून, तर दादासाहेब सोनमाळी हे उपसरपंच म्हणून कारभार करत आहेत. जिल्हा परिषद सदस्य अंबादास पिसाळ यांच्या पत्नी सुनंदा पिसाळ असून उपसभापती योगिता सोनमाळी यांचे पती दादा सोनमाळी आहेत. ग्रा.पं., पंचायत समिती व जिल्हा परिषद ही सर्व सत्तास्थाने अंबादास पिसाळ यांच्या ताब्यात आहेत.
31 मे 2008, 30 जून 2008 व 31 जुलै 2008 या सलग तीन मासिक सभा घेण्यात सरपंच व उपसरपंच यांनी कसूर केल्याने त्यांना अपर जिल्हाधिकारी जी. आर. खरात यांनी अपात्र ठरविले आहे.
कर्जत ग्रा.पं.चे सदस्य व मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनी पिसाळ व सोनमाळी यांना अपात्र ठरवून त्यांनी केलेल्या विविध विकासकामांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्याने सचिन पोटरे यांनी कर्जत येथे रास्ता रोको, पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण व जिल्हा परिषद, अहमदनगर येथे उपोषण केले होते. त्याची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रा.पं. कार्यालयातील कपाटाचे कुलूप तोडून पंचनामा करून दप्तर तपासणी केली होती. गटविकास अधिकारी सुनील पठारे यांनी सुनंदा पिसाळ व दादा सोनमाळी यांनी सलग तीन मासिक सभा घेतल्या नाहीत असे लेखी कळवून कारवाई व्हावी, असे मत वरिष्ठांना लेखी कळविले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्यांना दिला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सचिन पोटरे म्हणाले की, पिसाळ व सोनमाळी यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्याचीही चौकशी होवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. पिसाळ व सोनमाळी यांनी यापुढे अपील न करता नैतिकता असेल तर पायउतार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सचिन पोटरे यांना वेळोवेळी नामदेव राऊत, नाथा गोरे, सचिन सोनमाळी, स्वप्निल देसाई, ताराबाई कुलवे, अनिल भैलुमे, संतोष मेहत्रे, सुवर्णा पोटरे, शैनाबी पठाण यांनी सहकार्य केले. |