- मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेला दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृत असून, या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरेसे पुरावे हाती आहे, असा युक्तिवाद सरकारी उज्ज्वल निकम यांनी मुंबई हल्ल्याच्या अंतिम युक्तिवादादरम्यान केला.
या खटल्यातील अंतिम युक्तिवाद आजपासून (मंगळवार) सुरू झाला. या हल्ल्याच्या कटात पाकिस्तानच्या सुरक्षा संघटनेचे अधिकारी सहभागी होते. कसाब व त्याच्या साथीदारांना शस्त्र हाताळण्याचे संपूर्ण प्रशिक्षण सुरक्षा संघटनेकडून देण्यात आले होते, असे निकम यांनी न्यायालयासमोर सांगितले. कसाबने आतापर्यंत वारंवार जबानी बदलल्या आहेत. त्याचेही त्याला प्रशिक्षण देण्यात आले असून, अल कायदाच्या पुस्तिकेत पोलिस आणि न्यायालयाची दिशाभूल कशी करावी, याबाबतची माहिती देण्यात आली आहे, असे सांगताना निकम यांनी न्यायालयासमोर प्रमुख मुद्दे मांडले. त्यातून त्यांनी या हल्ल्यामागे पाकचा हात असल्याचे स्पष्ट केले. दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरू असताना कसाब आणि त्याच्या साथीदारांना मार्गदर्शन करण्यासाठी एक मेजर जनरल येत होता. त्याच्या निरीक्षणाखालीच हे शिबिर झाले होते. त्यामुळे तो पाक लष्कराचाच एक भाग असावा, असा मुद्दा निकम यांनी सादर केला. कसाबला समीर दिनेश चौधरी या नावाने ओळखपत्र देण्यात आले होते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. भारतातून जी टेलिफोनिक बोलणी झाली होती, त्यातून काही दूरध्वनी पाकिस्तानमध्ये, तर काही दूरध्वनी तेथील मीडिया हाऊसला गेले होते. एका दूरध्वनीमध्ये कुबेर बोटीचा उल्लेख झाल्याचेही पुरावे आहेत, असे निकम म्हणाले. या खटल्याच्या सुनावणीसाठी गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री रमेश बागवे हे उपस्थित होते. |