- त्यांना जनतेने सरकार बनविण्यासाठी नव्हे, तर विरोधी पक्षात बसण्यासाठी निवडून दिले आहे. त्यांनी ते काम जबाबदारीने करावे, हुकूमशाहीची भाषा वापरू नये, अशा ठाकरेंना उत्तर द्यायला आमचेही ठाकरे (माणिकराव) कमी नाहीत, असा टोला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेना, मनसेला लगावला.
विविध कार्यक्रमांनिमित्त मुख्यमंत्री चव्हाण उस्मानाबाद दौर्यावर होते. या वेळी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्यात त्यांचे भाषण झाले. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणार्यांना उत्तर द्यायला आमचे माणिकराव ठाकरेही कमी नाहीत, असे सांगत त्यांनी शिवसेना, मनसेला आव्हान दिले. महाराष्ट्रातील जनतेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी निवडून दिले आहे. याचे भान ठेवूनच सरकार सामान्यांसाठी सत्ता राबवीत आहे. राज्यातील दारिद्य्ररेषेखालील नागरिकांसाठी लवकरच राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सुरू करणे हा सामान्यांच्या भावनेचाच एक भाग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ग्रामीण भागासह शहरी भागातील दारिद्य्ररेषेखालील नागरिकांचे आरोग्यासाठी होणारे हाल न पाहवणारे आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की त्यासाठी आमच्या आरोग्य विभागाने नवीन योजना राबविण्याचे ठरविले आहे. अशा नागरिकांचा आजार कोणता का असेना शस्त्रक्रियेसाठीचा सर्व खर्च सरकार करील. मराठवाडा, विदर्भासोबतच उर्वरित महाराष्ट्रातही पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागांत सिंचनाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येतील. यासाठी 100 टक्के खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. सामान्य जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिल्याने त्यांच्या भावनांचा आदर करीतच आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार चालवीत आहोत, याचा विचार करावा, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना काढला.
|