- मराठी जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळे मनसेने भरारी घेतली, या यशाचे श्रेय मराठी माणसाला जाते. पुढील काळात राज्यातील जनतेशी प्रतारणा करणार नाही, असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.
मनसेला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दादर येथील यशवंतराव नाट्यगृहात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यात राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा लावून धरला. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने भडक भाषणे करू नये, अशी समज राज ठाकरे यांना दिली. त्या पार्श्वभूमीवर राज यांच्या आजच्या भाषणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. महिला आरक्षण विधेयकाला मनसेचा पाठिंबा असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. मुलायमसिंह यादव आणि लालूप्रसाद यादव या आरक्षणाला विरोध करत आहेत. त्यातून त्यांची संस्कृती कळते, असा टोलाही त्यांनी लगावला. तुरुंगात गेल्यावर लालूंनी आपल्या बायकोलाच पदावर बसवले ना, असा प्रश्नही त्यांनी विचारला. महिलांनो आरक्षण जरूर घ्या, पण कारभार तुम्हीच करा. तुमच्या नवर्याकरवी कारभार करू नका, असे आवाहन केले. ते म्हणाले, शिवसेना सोडल्यानंतर माझ्यासमोर कोणतेही चित्र स्पष्ट नव्हते. दुसर्या पक्षात प्रवेश करणे किंवा स्वतः:चा राजकीय पक्ष स्थापन करणे एवढे दोनच पर्याय होते. शिवसेना सोडताना माझ्यासोबत अनेकजण होते. मात्र, दुसरा पक्ष स्थापन करताना किती जण येतील, अशी साशंकता होती. मात्र, पक्षस्थापनेच्या निर्णयाचा सर्वांनी आदर केला. सुरुवातीला इतर पक्ष मनेसचे अस्तित्व मान्य करायला तयार नव्हते. त्यानंतर आलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेने पटकावलेल्या जागा पाहून वर्तमानपत्रांनी पार्टी ओव्हर अशा शीर्षकाखाली बातम्याही छापल्या होत्या. ही शीर्षके वाचून मी अस्वस्थ झालो होतो. पण, मराठी जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला, आणि त्यातूनच मनसेने भरारी घेतली. महाराष्ट्रात चांगले विचार पटकन रुजतात. आपली लढाई विचारांनी जिंकली पाहिजे, पैशांनी नाही. तिथे विचार संपतात, तिथे पैसे सुरू होतात, असेही राज म्हणाले. |