- ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्यासाठी सोमवारी समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टीच्या गोंधळी खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजातून निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी केली.
वीरपालसिंह यादव, नंदकिशोर यादव, आमीर आलम खान, कमाल अख्तर (सपा), सुभाष यादव (राजद) आणि साबीर अली (एलजेपी) यांचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. महिला आरक्षण विधेयकात मुस्लिम आणि मागासवर्गीय महिलांसाठी कोटा ठेवावा, अशी आग्रही मागणी मुलायमसिंह यादव आणि लालूप्रसाद यांनी केली होती. या मागणीवर कार्यवाही होत नाही, तोवर हे विधेयक मंजूर होऊ न देण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. पण, केंद्र सरकारने त्यावर काहीच भूमिका न घेतल्याने संतप्त सपा, राजदच्या खासदारांनी राज्यसभेचा आखाडा केला होता. सोमवारी दोन वेळा त्यांच्या गोंधळामुळे कामकाज तहकूब करावे लागले होते. सपा, राजद आणि लोजपाच्या सात सदस्यांनी हमीद अन्सारी यांच्या आसनावरच आक्रमण केले. त्यांच्या टेबलावरच्या वस्तू त्यांनी फेकून दिल्या, माईक खेचला, अन्सारी यांची कागदपत्रे आणि विधेयकाच्या प्रती फाडून टाकल्या. कमाल अख्तर हे तर राज्यसभा सरचिटणीस विवेककुमार अग्निहोत्री यांच्या टेबलावरच चढले. या पार्श्वभूमीवर या सातही जणांना आज, अधिवेशन काळापुरतं निलंबित करण्यात आले.
|