- समाजात सेवाभावी वृत्तीने काम केल्याने त्यांची दखल घेतली जाते. याकरिता युवकांनी सेवाभावी वृत्ती जोपासावी, असे आवाहन निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे मार्गदर्शक बाबासाहेब कवाद यांनी केले. महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने शुभमंगल योजनेतून वधुपित्याला दहा हजार, तर संस्थेला दोन हजार अशा साठ हजार रुपयांच्या अनुदानाचे धनादेश आज वधूपित्यांना कवाद यांच्या वतीने प्रदान करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्था आणि निघोज ग्रामीण परिवार यांच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. मे 2009 या वर्षात 13 विवाह सोहळे झाले. यामध्ये पाच वधूपित्यांनी कागदपत्रे सादर केली होती. संबंधित संस्थांनी पाठपुरावा केल्याने हे अनुदानाचे धनादेश मिळाले आहेत. या वेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेव थोरात, सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कवाद, सचिव वसंत कवाद, सोहळा उत्सव समितीचे पदाधिकारी विठोबा कवाद, पतसंस्थेचे व्यवस्थापक दत्तात्रय लंके, सेवा सोसायटीचे संचालक अशोक ढवळे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव बबनराव ढवण, विष्णू कवाद, भगवान श्रीमंदिलकर, संपत वैरागर, अनिल लंके, प्रकाश साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कवाद म्हणाले की, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी ज्या योजना सरकारकडे आहेत, त्यांचा फायदा जनतेला मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. अशाच प्रकारे संस्था परिवार आणि सेवाभावी संस्थेचे काम केल्यानेच अनुदानाची रक्कम मिळाली. आजच्या महागाईचा विचार करता सामुदायिक विवाह सोहळे ही काळाची गरज बनली आहे. संस्था परिवारातील सर्वच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले म्हणूनच गेली दहा वर्षे विवाह सोहळ्याचे नियोजन चांगले झाले आहे. राजकारणापेक्षा समाजकार्य महत्त्वाचे आहे. याकरिता सेवाभावी वृत्तीचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे सचिव वसंत कवाद यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती सांगितली. सरकारचे शुभमंगल योजनेच्या माध्यमातून गोरगरीब समाजाला जो आर्थिक आधार मिळाला, त्याबद्दल समाधान व्यक्त केले. एस. व्ही. मंचरकर, संजय सांगळे, शहनाज पठाण यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. म्हणूनच हे धनादेश वधू-पित्यांना देण्यात आले. अशाच प्रकारे 16 मे रोजी संस्थेच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, वधू-वर पित्यांनी या विवाह सोहळ्यात नाव नोंदवावे, असे आवाहन कवाद यांनी केले. भगवान श्रीमंदिलकर यांनी आभार मानले.
|