शुक्रपारपासून पुन्हा एकदा आयपीएलचा थरार आपणास पहावयास मिळणार आहे. मात्र यावर्षी आयपीएलचा थाट काही औरच असणार आहे. यू.एफ.ओ तंत्रज्ञानाच्या साह्याने यावेळचा आयपीएल चक्क सिनेमागृहात रंगणार आहे. आयपीएल ही क्रिकेट जगतामधली एक सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धेच्या सलग दोन आवृत्या अतिशय धुमधडा्नयात पार पडल्या आहेत. दोन पर्वाच्या सुलभ यशानंतर आयपीएल 12 मार्चपासून तिसर्या पर्वात पदार्पण करीत आहे. त्याच्या पहिल्या दोन पर्वावर हा थोडासा प्रकाशझोत.
इंडियन प्रिमियर लीगची दुसरी स्पर्धा स्पर्धा अनेक वादविवाद उलट-सुलट चर्चेनंतर दक्षिण आफ्रिकेत पार पडली होती, तर आजा त्याची तिसरी पर्वणी येत्या 12 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी नऊ हजार कोटी रुपये मोजले गेले आहेते. जगातल्या सर्वात मोठ्या सिनेसृष्टीतले दोन सुपरस्टार्स, जगातल्या सर्वात मोठ्या मद्य उत्पादकांपैकी एक उद्योगपती, जगातल्या सर्वात मोठया तेल शुद्धीकरण कंपन्यांपैकी एका कंपनीचा मालक अशी वजनदार मंडळी गुंतलेली आहेत. त्याचप्रमाणे जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटमंडळाच्या सर्वात महत्त्वकांक्षी व्यक्तीची ही स्पर्धा असल्यामुळे ही स्पर्धा पार पडणार हे नक्की. या स्पर्धेमध्ये क्रिकेटबाहेरचे अनेक गोष्टींना कमालीचे महत्त्व होते. त्याची चर्चाही झाली. परंतु प्रत्यक्ष मैदानावर खेळ करत असताना मात्र केवळ क्रिकेटच्याच कौशल्यांना अजून महत्त्व आहे. त्यामुळेच अस्सल क्रिकेटपटूंचं नाण या स्पर्धेत खणखणीत वाजणार हे नक्की.
टी-20 हे केवळ युवा क्रिकेटपटूंसाठीच असते या गृहितकाला यंदाच्या स्पर्धेत जोरदार तडा जाणार. राजस्थान रॉयल्सच्या संघाने मागच्या स्पर्धेत सर्वांनाच चकीत केले होते. तर दुसर्या वर्षीही त्यांनी झुंजार वृत्ती जिवंत असल्याचे सिद्ध केले होते. काही मोजक्या गोष्टी सुधारल्या तर हा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार बनू शकेल.
कोलकता आणि मुंबई या संघासाठी ही स्पर्धा म्हणजे एक दुस्वप्नचं ठरली आहे. कोलकता संघ मैदानाबाहेरच्या गोष्टीमुळेच अधिक अडचणीत आला. मल्टीपल कॅप्टन्सचा वाद, सौरव दादाची कर्णधारपदावरून केलेली हाकालपट्टी असे अनेक डावपेच आणि फेक ब्लॉगरचा पाठलाग यामुळे हा संघ अगदी रसातळाला गेला. संपूर्ण स्पर्धेत हा संघ केवळ हरण्यासाठीच खेळत होता. विजयाच्या तोंडातून अनेक पराभव या संघाने खेचून आणले होते. मुंबई इंडियन्सचे सारेच डावपेच अनाकलनीय होते. सचिन तेंडुलकर हा महान खेळाडू आहे. परंतु त्याला कर्णधार पदाचा भार पेलवत नाही...ही बाब गेल्या स्पर्धेत पुन्हा एकदा सिद्ध झाली. फलंदाजीच्या क्रमावारीत होणारा बदल, झहीरची दुखापत, हरभजनच्या भूमिकेबाबत गोंधळ, जयसूर्याचा हरवलेला फॉर्म, सचिनच्या बॅटमधला चढ-उतार या बाबी संघाला सातव्या क्रमकावर घेऊन गेल्या. युवराजच्या लहरी फलंदाजीप्रमाणेच पंजाबचा खेळ या स्पर्धेत राहिला होता. या संघाने शेवटपर्यंत झुंज दिली. परंतु शॉन मार्शची अनुपस्थिती आणि जयवर्धनेला अत्यंत महत्वाच्या क्षणी झालेली दुखापत यामुळे हा संघ सरत्यावर्षी उपांत्य फेरी गाठू शकला नाही.
दिल्ली आणि चेन्नई हे या स्पर्धेतले सर्वात संतुलीत संघ होते. भारतीय आणि परदेशी खेळाडूंचे योग्य मिश्रण या संघात आहे. दिल्लीने साखळी सामन्यात अत्यंत धडाकेबाज पद्धतीने खेळ केला होता. नेहराने या स्पर्धेत शानदार कमबॅक केले. डिव्हीलीयर्स-दिलशान जोडीने जबाबदार खेळ केला. कार्तिक- भाटीया-संगवान या युवा भारतीय खेळाडूंनीही दिल्लीला विजय मिळवून दिले. गिलख्रिस्टच्या जबरदस्त खेळीमुळे दिल्ली संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. डेक्कन आणि बंगळूरू या संघाने तर दुसर्या आयपीएल स्पर्धेत अगदी फिनीक्स भरारी घेतली होती. डेक्कनने सलग चार विजय मिळवत शानदार सुरुवात केली. मधल्या काळात हा संघ ढेपाळला. परंतु गिलख्रिस्ट आणि रोहीत शर्माच्या झंझावाताला डेक्कनच्या युवा फलंदाजांनीही साथ दिली. या स्पर्धेचा पर्पल कॅप विजेता आर.पी.सिंग डेक्कनचाच टरला. टी- 20 विश्वचषकात त्याच्या या कौशल्याचा भारतीय संघाला महत्त्वाचा उपयोग होऊ शकेल. आयपीएल-2 मधली सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर ते अनिल कुंबळेचं मॅजिक..आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या या खेळाडूचा चेळ या संपूर्ण स्पर्धेत अगदी दृष्ट लावणारा ठरला होता. राहुल द्रविड- जॅक कॅलीस या बुजूर्ग खेळाडूंपासून ते विराट कोहली-मनीष पांडे या युवा खेळाडूंना जम्बोने एका संघात बनवले. प्रत्येक खेळाडूला विश्वास दिला, सुरक्षितता दिली. हे सर्व होत असताना कुंबळेने युद्धभूमीवर आघाडीवर राहून संघाचे नेतृत्व केले. अंतिम सामन्यातली त्याची गोलंदाजी कोण विसरू शकेल. क्रिकेटमध्ये धंदेवाईक वृत्ती वाढत चाललीय. लॅपटॉप प्रशिक्षणाचं युग आले आहे. खेळाडू हे यंत्रमानव बनलेत अशी ओरड नेहमी केली जाते. परंतु कितीही यांत्रिक प्रयत्न केले तरी गुणवत्ता आणि क्रिकेटवरची निष्ठा महत्त्वाची असते. क्रिकेट या खेळाचे चाहते लाखोंमध्ये आहेत. परंतु हा खेळ खेळणारे देश अगदी मोजकेच आहेत. या मोजक्या देशातल्या अगदी असामान्य खेळाडूंमध्ये अनिल कुंबळेचे नाव घ्यावं लागेल. आयपीएल जिंकण्यास तो अपयशी ठरला आहे. परंतु करोडो क्रिकेट रसिकांच्या हृदयामधले स्थान त्याने अढळ ठेवले आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची आयपीएलच्या नादात विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेकडे दुर्लक्ष करणे जरा घातकच ठरणार. मार्च - एप्रिल हा विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ आहे, त्वहा क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांनी जरा वेळेचे नियोजन करूनच या स्पर्धेची मजा लुटावी. |