- शहरातील चित्रा चित्रपटगृहामागील चित्रागल्लीतील वेश्यांचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वेश्यांवर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी कोतवाली पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला.
वेश्या व्यवसाय करणार्या महिलांचा त्वरित बंदोबस्त करावा यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांना नागरिकांच्या सह्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे. लालबत्तीतील अंबिका परदेशी ही महिला अमली पदार्थ सेवन करून दिवसा व रात्री चागंलाच धिंगाणा घालते. तसेच परिसरातील नागरिकांना अश्लील भाषेत व जातीवाचक शिवीगाळ करते. यामुळे नागरिक व विडी कामगार महिला भयभीत झाल्या असून, लहान मुलांवर त्याचा परिणाम होत आहे. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. सीडीच्या मोठ्या आवाजाने मुलांचा अभ्यास होत नाही. सदर महिलेस समजावून सांगितले असता सीडीचा आवाज कमी करणार नाही, पोलिस माझे काही वाकडे करू शकत नाही. तसेच पोलिसांना मी हातावर नाचवते असे म्हणून जीव मारण्याची धमकी देते. गुंडांना आणून तुमचे हातपाय तोडणार असल्याची धमकी देते. ती रोजच अनेकांबरोबर मोठमोठ्याने वाद करत असते.
अंबिका परदेशी या महिलेवर खुनाचा गुन्हा यापूर्वी दाखल झाला आहे. तसेच ती वेश्या व्यवसाय करणार्या मुलींची बॉस म्हणून काम पाहते. याच परिसरात गरीब, होतकरू विडी कामगार राहत असल्याने या वेश्या व्यवसाय करणार्या अंबिकाचा त्यांना मोठा त्रास होत असल्याने तिच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे नागरिकांनी केली. |