शेवटच्या दिवशी २५ उमेदवारांनी घेतली माघार
सातपूर परिसरातील पाच प्रभागातून २५ उमेदवारांनी माघार घेतली असून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह १० जागांसाठी ९३ उमेदवार रिंगणात आहेत.
सातपूर परिसरातील प्रभाग १७, १८, १९, २०, ५० या पाच प्रभागातील प्रत्येकी दोन जागांसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २७७ जणांनी अर्ज दाखल केले होते. आज (दि.४) उमेदवारी माघारीचा दिवस होता. त्यातील २५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह ९० उमेदवार रिंगणात आहेत.
त्यात प्रामुख्याने प्रभाग १७ अ मधून अर्जुन धोत्रे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे येथे पाच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांत लढत रंगणार आहे. प्रभाग १७ ब मधून पारूबाई रामचंद्र धोत्रे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या प्रभागात ५ प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवारांसह १० उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. प्रभाग १८ अ मधून विमल नागरे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे येथे ४ प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांत लढत रंगणार आहे. प्रभाग १८ ब मधून विश्वास नागरे, जगन्नाथ चव्हाणके, महेश सोनगिरकर या तिघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या प्रभागात ९ उमेदवारांत लढत रंगणार आहे.
प्रभाग १९ अ मधून चंद्रकांत निर्वाण यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे येथे ४ प्रमुख पक्षांच्या उमेदवारांत लढत रंगणार आहे. प्रभाग १९ ब मधून रूपाली धीरज शेळके यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या प्रभागात ११ महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. प्रभाग २० अ मधून ललिता जाधव, संगीता पगारे, अनुसया काळे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या प्रभागात एका अपक्षासह ५ प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवारांत लढत रंगणार आहे. प्रभाग २० ब मधून दीपक लोंढे, भीवानंद काळे, अरुण काळे या तिघांच्या माघारीनंतर प्रभागात ११ विविध पक्षांसह १४ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.
प्रभाग ५० ब मधून गोरख घाटोळ, रामचंद्र निगळ, भाऊसाहेब आव्हाड, मधुकर जाधव, चंद्रकांत निर्वाण, माधव तिडके, सारला सांगळे, राकेश तांबे, अशोक पारखे यांनी माघार घेतली. त्यामुळे या प्रभागात अपक्षांसह ५ प्रमुख पक्षांच्या १४ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. प्रभाग ५० अ मधून भारती बेंडकुळे यांच्या माघारीनंतर प्रभागात २ अपक्षांसह ५ विविध पक्षांच्या उमेदवारांसह ८ महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.
जवळजवळ सर्वच पक्षांच्या उमेदवार्या जाहीर झाल्याने बहुतांश पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
अपक्ष व बंडखोरांचा भरणाही मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची संख्या घटवण्यात प्रमुख उमेदवारांना बर्यापैकी यश आले आहे. त्यात काहीवेळा ‘कही खुशी कही गम’ सारखे चित्र दिसून येत होते. उमेदवारी मागे घेताना उमेदवारांमध्ये नाराजी स्पष्ट दिसून येत होते, तर उशिरा उमेदवारी जाहीर झाल्याने काही उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. काही प्रभागात पूर्वीपासून तयारी केलेल्या परंतु जोडीदाराला उमेदवारी न मिळाल्याने उमेदवारी मिळूनही नाराजीचे वातावरण दिसून येत होते.
निवडणूक अर्ज माघारीचा काल अखेरचा दिवस असल्याने कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही.निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधिकारी डी. एम. राशिनकर, कोंडीराम वाडेकर, रमेश पाटोळे हे संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून होते.
|