निवडणूक आचारसंहितेमुळे फलकबाजीला चाप
नाशिक,दि.२७(प्रतिनिधी)- शहरात साजरे होणारे कोणतेही सण-उत्सव किंवा एखाद्या बड्या नेत्यापासून ते गल्लीत जन्मलेल्या लहान मुलापर्यंत सर्वांचेच वाढदिवस आणि इतर कारणांसाठी शुभेच्छा देणार्यांमध्ये लागणार्या फलकबाजीच्या स्पर्धेमुळे कोंडमारा होणारे शहरातील गल्ली-बोळ आणि प्रमुख रस्ते गेल्या काही दिवसांपासून मोकळा श्वास घेत आहेत.
विविध प्रकारच्या शुभेच्छा आणि कार्यक्रमांच्या फलकबाजीमुळे शहरातील रस्ते, चौक, गल्ल्या यांना येणारे बकालपण नाशिक महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच गायब झाले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागातून फिरताना काही प्रमाणात का होईना ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’चा अनुभव नागरिक घेत आहेत. एरवी गल्लीतला दादा, भाई, बॉस असो वा दिल्लीत राजकारण करणारे साहेब, अण्णा, अप्पा, तात्या असो यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे शहरात आगमन होणार असल्यास त्यांच्या स्वागतासाठी आपण किती आतुर आहोत हे दाखविण्यासाठी फलकबाजी करून शहरातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण करणार्यांना आचारसंहितेमुळे चांगलाच चाप बसल्याची भावना नाशिककरांमधून व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानी तसेच मोक्याच्या ठिकाणी जाहिरातीसाठी उभारलेल्या फलकांवरही अतिक्रमण करणार्या या फलकबाजांना कायमस्वरुपी धडा शिकविण्यासाठी महानगरपालिकेने शहरात बेकायदा आणि अस्ताव्यस्त स्वरूपात लावण्यात येणार्या फलकांसाठी स्न्वेअरफूट दराने शुल्क आकारणी करण्याची मागणी नाशिककर करीत आहेत. फलक बनवून देणार्या व्यावसायिकांकडूनही महानगरपालिकेने फलक छपाईच्या दरातच कर आकारणी केल्यास तुलनेने स्वस्त असलेली फ्लेक्स प्रिंटिंग काही प्रमाणात महाग होऊन शहरात उतू जाणार्या फलकांच्या संख्येलाही आळा बसणार असल्याचे नागरिक सांगतात. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार डिस्प्ले करून मोफत प्रसिद्धी करता येणार नसल्याने सार्वजनिक जागांबरोबरच खासगी मालकीच्या जागांमध्ये उभारण्यात येणार्या मोठ-मोठ्या डिस्प्ले बोर्डांच्या निर्मितीवरही निर्बंध लावण्याबरोबरच जबर कर आकारणी करण्याची मागणी होत आहे.
फलकबाजीविरोधात कारवाई करून शहर फलक आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केवळ आचारसंहितेच्या काळातच आपली जबाबदारी पार न पाडता वर्षभर कार्यरत राहण्याची अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. शिवाय महानगरपालिकेत नाशिककरांचेच प्रतिनिधित्व करणार्या महापौरांसह नगरसेवकांकडून शहरातील गल्ली-बोळांसह प्रमुख रस्ते आणि चौकांना फलकमुक्त ठेवून शहर सुंदर बनविण्यासाठी स्वत:चीच एक आचारसंहिता का तयार केली जात नाही असा प्रश्नही नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.
|