बारागाव पिंप्री : पाणीप्रश्नावर बोलू न दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत आचारसंहिता लागु असल्याच्या कारणास्तव ग्रामस्थांना पाणीप्रश्नावर बोलण्यास हरकत घेऊन उपसरपंच व ग्रामसेवकाने ग्रामसभा आटोपती घेत गुंडाळल्याचा आरोप बारागाव पिंप्रीच्या ग्रामस्थांनी केला आहे.
गावाला भेडसावणार्या पाणीटंचाईवर मार्ग काढण्यासाठी ग्रामसभेत चर्चा करण्याची मागणी बारागाव पिंप्रीच्या ग्रामस्थांनी केली होती. सरपंच सौ. स्वाती उगले गत तीन महिण्यांपासून रजेवर असून प्रभारी सरपंच तथा उपसरपंच पंढरीनाथ गोराडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२६) ग्रामपंचायत कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ग्रामस्थांनी पाणी प्रश्नावर बोलण्यास सुरुवात करताच श्री. गोराडे यांनी आचारसंहितेचा बाऊ करत हरकत घेतली. ग्रामपंचायत सदस्य झकमारायला निवडून आले आहेत का? असे सांगत त्यांनी ग्रामसभा संपल्याचे जाहीर करत सभात्याग केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा आरोप गटविकास अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी यावेळी श्री. गोराडे यांना समजावून सांगत पाणीप्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली. ग्रामसभा अर्धवट सोडून जाणार्या उपसरपंचाच्या निषेधाचा ठराव करुन त्यांचे पद रद्द करावे अशी एकमुखी मागणी केली. तसा ठराव नोंदवून ग्रामसभेची मंजूरी घेण्याची सुचना करुनही ग्रामसेवकाने उडवाउडवी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अशा प्रकारचा ठराव करता येणार नसल्याचे सांगत ग्रामसेवकानेही आचारसंहितेचे निमित्त करुन ग्रामसभेत पाणी प्रश्नच काय पण अन्य कोणत्याही विषयावर चर्चा करता येणार नसल्याचे सांगीतले. त्यांनी उपसरपंच पद रद्द करणारा ठराव इतिवृत्तात नोंदवून घ्यायला नकार दिल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्यांना निवेदन दिले असून गावाला भेडसावणार्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात ग्रामसभेत चर्चा करण्यास हरकत घेणार्या उपसरपंच व त्यांना याकामी मदत करणार्या ग्रामसेवकाविरोधात कठोर कारवाई करावी, वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत पुन्हा ग्रामसभा घेवून गावाला भेडसावणार्या अडचणीसंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. निवेदनावर अशोक उगले, पांडुरंग गोडगे, केशव उगले, सुनिल उगले, अजिज शेख, जाकिर शेख, अशोक घुमरे, रमेश जाधव, अर्जुन वाणी, सोपान पानसरे, अरुण खांदोडे, संपत उगले, गोरक्षनाथ कटके, सुरेश उगले, तानाजी ताकाटे, सुभाष कुर्हाडे, गंगाधर उगले, दत्ता उगले, विलास उगले आदींच्या सह्या आहेत.
|