Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:23:34 hrs

मुख्य पान | कुसुमाग्रजांच्या शैक्षणिक विचारांच्या पूर्ततेचा आजही ध्यास - डॉ. ताकवले
कुसुमाग्रजांच्या शैक्षणिक विचारांच्या पूर्ततेचा आजही ध्यास - डॉ. ताकवले
Nasik(11-March-2010)
Tags : Nashik,News,Regional
 

हृद्य सोहळ्यात सहा नक्षत्रांना ‘गोदावरी गौरव’ प्रदान
नाशिक, दि. 10 (सांस्कृतिक प्रतिनिेधी)-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या रूपाने कविवर्य कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतील शिक्षणमुक्ती आणि मुक्त शिक्षणाच्या प्रयोगाची अपेक्षापूर्ती झाली काय, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना कुसुमाग्रजांच्या मनातील शैक्षणिक विचारांच्या पूर्ततेच्या ध्यासामुळे आजही नवनवीन प्रयोग करण्याची उर्मी जपल्याचे भावपूर्ण उद्गार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी काढले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर परिसरातील प्रसिद्ध नेपथ्यकार अरुण रहाणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या ‘कुसुमाग्रज ग्राम’मध्ये हजारो रसिकांच्या उपस्थितीत नाशिकच्या सांस्कृतिक चेहर्‍याची ओळख करून देणारे चैतन्य निर्माण करणार्‍या मराठमोळ्या वातावरणात विविध क्षेत्रात देदीप्यमान कार्य करणार्‍या डॉ. राम ताकवलेंंसह पाच मान्यवर नक्षत्रांना ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना शिक्षणतज्ज्ञ डॉ. ताकवले बोलत होते. ज्ञानयोगी ज्ञानेश्वरांचा आशीर्वाद आणि गोदावरीच्या पवित्र स्नानाचे पुण्य देणारा सर्वश्रेष्ठ गोदावरी गौरव पुरस्कार असल्याची भावना व्यक्त करून डॉ. ताकवले म्हणाले की, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज आणि शिक्षण यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करणार्‍या शिक्षणप्रेमींनी नीतिमत्ता जपणारे शिक्षण निर्माण केले पाहिजे. शाश्वत समाजविकासासाठी महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ मधील निर्मितीक्षम व्यवसायाभिमुख नवी शिक्षणपद्धती स्थापन झाल्यास तळागाळात शिक्षण रुजेल. कामातून शिक्षण आणि शिक्षणाद्वारे काम हा शिक्षणाचा हेतू असायला हवा,अशी अपेक्षा व्यक्त करून शिक्षणक्षेत्रात करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक-निर्माते डॉ.जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि महापौर नयना घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले (ज्ञान), लोककलांच्या सादीकरणातून मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करणारे आणि शाहिरीसह नाट्यचळवळ खेडोपाडी पोहचविणारे पद्मश्री कृष्णराव साबळे (नाट्य), देशपरदेशातील अनेक मैफिलीत रसिकांना आनंददायी अनुभती देणारे ख्यातनाम सतारवादक पद्मभूषण उस्ताद अब्दुल हलीम जाफरखान (संगीत), भोपाळ गॅसपीडितांच्या न्याय्य हक्कांसाठी झटणारे अब्दुल जब्बार खान (लोकसेवा), निसर्गप्रतिमा आणि विविध वस्तूंची रचना करून नयनरम्य कलाकृतींचाआविष्कार करणारे ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते (चित्र), 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी लाखो नागरिकांचे प्राण वाचविणारे रेल्वेचे उद्घोषक विष्णू झेंडे (साहस) यांचा अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सत्कारार्थी शाहीर साबळे यांनी संपूर्ण जगात कार्यक्रम केले, मात्र नाशिकच्या माझ्या ‘आशिक’ प्रेक्षकांना मी कधीही विसरणार नसल्याचे सांगून वयाच्या 87 व्या वर्षीही कणखर आवाजात मुंबईची स्वत: रचलेली लावणी सादर करून रसिकांची दाद मिळवली. तर सतारवादक उस्ताद अब्दुल जाफरखान यांनी धरती आणि सूर्याचे प्रेम मांडणारे कुसुमाग्रज यांचे नाते जोडणारा हा पुरस्कार असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. भोपाळ गॅसपीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अविरत कष्ट घेणार्‍या लोकसेवक अब्दुल जब्बार खान यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देशात पसरवलेल्या जाळ्याबद्दल खेद व्यक्त करून भारताने कंपन्यांपेक्षा जनतेच्या कल्याणाची काळजी करण्याचे आवाहन केले. नाशिकमध्ये असलेल्या एकोप्याच्या वातावरणाचे कौतुक करून पुरातन वास्तूंचे जतन करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. तसेच 3 डिसेंबर हा ‘भोपाळ दिवस’ नाशिकमध्ये साजरा करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहनही केले. ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांनी शब्दप्रभू कुसुमाग्रजांच्या गावात होणार्‍या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करून महाराष्ट्र शासनाच्या कला-सांस्कृतिक धोरणात चित्रकलेला पुरेसा वाव देण्याची गरज मांडली. कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता सादर करून पाठीचा कणा ताठ असल्याचे आवर्जून सांगितले. दहशतवादी हल्ल्याप्रसंगी लाखो प्रवाशांचा प्राण वाचविणारे साहसी उद्घोषक विष्णू झेंंंडे यांनी सत्काराला उत्तर देताना आजही त्या दुर्दैवी घटनेने डोळ्यात पाणी येत असल्याचे सांगून ‘वेळ संपली आहे फक्त रामचरित्र वाचण्याची, आज प्रत्येकाची वेळ आली आहे प्रत्येकाने राम बनण्याची’ अशा काव्यपक्तींनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे विचार मांडले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी पुरस्कारप्राप्त गौरवार्थींच्या कार्याचा मोजक्या शब्दात गौरव करून समाजाच्या सर्व क्षेत्रांपर्यंत पोहचलेल्या आपल्या देशातील विकासाचा मागोवा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेसाठी असणार्‍या आरक्षणापासून ते आताच्या महिला आरक्षणापर्यंत देशाची होणारी प्रगती आशादायक असल्याचे सांगून सर्वसामान्यांचा उत्कर्ष होणार्‍या शिक्षणप्रणालीची आवश्यकता प्रतिपादन केली. भाषणाच्या शेवटी कुसुमाग्रजांची ‘याच मातीत’ ही कविता सादर केली. डॉ. रामदास बरकले यांच्या दिग्दर्शन आणि संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमात खास नाशिकचे सांस्कृतिक वैशिष्ट्य असणार्‍या वीर आणि बोहाड्याच्या सादरीकरणासह कवी संतोष हुदलीकर यांनी लिहिलेल्या गौरवार्थींंच्या परिचयात्मक कवनांचे सादरीकरण करून चंद्रकांत नाकील आणि सहकार्‍यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ध्रुवकुमार तेजाळे आणि प्रकाश साळवे यांच्या संगीतसंयोजनाखाली पुष्कराज साळवे, सुनील साळवे, प्रमोद बोरसे, फारुक शेख आदींनी उत्कृष्ट तालसंगत केली. रावण झालेल्या सी.एल. कुलकर्णी यांनी बोहाड्यात, तर ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी र्भोईर कारभारी असलेल्या वीरांच्या नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. लोककलांचे उत्कृष्ट सादरकर्ते अशोक हांडे यांच्या महाराष्ट्र गीताने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमाचा समारोपही त्यांनी सादर केलेल्या ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या गीताने झाला. स्वागत प्रतिष्ठानचे कार्यवाह अॅड. विलास लोणारी यांनी केले.


प्रिंट काढा