नेवासा : आज मतदान

0

आ. मुरकुटे, माजी आ. गडाख यांची प्रतिष्ठा पणाला

नगर पंचायतची पहिलीच निवडणूक, 64 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार, 17 प्रभागांत 13753 मतदार, चोख पोलीस बंदोबस्त

नेवासा (का. प्रतिनिधी)- मागील दहा-बारा दिवसांपासून प्रचाराचा धुराळा उडालेल्या नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार काल सायंकाळी थंडावला व आज बुधवार 24 मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 17 प्रभागांच्या 17 जागांसाठी 64 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज असून पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्यातील तालुक्याची ठिकाणे असलेल्या सर्व गावांमध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार नगरपंचायती अथवा नगरपरिषदा स्थापन केल्या गेल्या. त्यातील बहुसंख्य ठिकाणी ठिकाणी मतदान पार पडले. मात्र नेवाशातील मतदानाची प्रक्रिया न्यायालयीन स्थगितीमुळे लांबणीवर पडली होती. सर्व अडचणी, अडथळे पार होत निवडणुक जाहीर होऊन आज मतदान होत आहे.
नेवाशातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत हे मतदान होत आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारी शेतकरी पक्ष सर्व 17 जागांवर, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष 16 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 3 जागांवर निवडणूक लढवीत आहे. त्याशिवाय काँग्रेस-1, मनसे 3 व शिवसेना 9 जागांवर रिंगणात आहे तर 15 अपक्षही नशीब अजमावत आहेत.
जिल्हाधिकारी अभय महाजन व पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी 20 मे रोजीच नगरपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. शांततेसाठी सर्वपक्षीय बैठक घेतली. शहरातील शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 47 लोकांना ताब्यात घेऊन 24 जणांना शहरातून हद्दपार केले आहे.
मतदान प्रक्रियेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक ट्रॅकिंग फोर्स, एक आरसीपी, एक डीवायएसपी, एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व 75 पोलीस कर्मचारी निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी सज्ज राहणार आहेत.
निवडणुकीसाठी शहरातील सर्व मतदारांना मतदान करता यावे यासाठी येथील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर किमान दोन ते तीन तासांची सुट्टी देण्यात यावी अशा आदेशाचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्यावतीने शासनाचे अवर सचिव रवींद्र जाधव यांनी काढले आहे.
मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, आधार ओळखपत्र, शिधापत्रिका, शासकीय कर्मचार्‍यांना फोटोसह दिलेली ओळखपत्रे, राष्ट्रीयीकृत बँका अथवा पोस्ट ऑफिसमधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र, सक्षम प्राधिकार्‍याने दिलेला फोटोसह अपंगत्वाचा दाखला, फोटोसह असलेला शस्त्रास्त्र परवाना, निवृत्तिवेतनधारकांचे फोटो असलेले प्रमाणपत्र, केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड आदी ओळख पुरावा म्हणून सादर करून मतदान करता येणार आहे.
निवडणूक प्रचार काळात उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. भाजपच्यावतीने पालकमंत्री राम शिंदे तसेच मंत्री रणजीत पाटील यांची सभा झाली. तर शिवसेनेसाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची सभा झाली. भाजपसाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अनेक सभा घेऊन माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. क्रांतिकारी पक्षासाठी पंचायत समिती सभापती सुनीताताई गडाख यांनी प्रचार फेर्‍या घेऊन शहर पिंजून काढले. तर तीन जागा लढवत असलेल्या राष्ट्रवादीनेही या जागा जिंकण्यासाठी सभा घेतल्या. आज सर्व 64 उमेदवारांचे भवितव्य नेवाशातील 13 हजार 753 मतदार मतदानयंत्रात मत नोंदवून ठरविणार आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी
104 अधिकारी व कर्मचारी सज्ज
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेवाशातील 17 प्रभागांसाठी 104 अधिकारी व कर्मचारी सज्ज आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात एक केंद्रप्रमुख, तीन निवडणूक कर्मचारी, एक शिपाई व एक पोलीस कर्मचारी असे 6 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. अशाप्रकारे एकूण 17 प्रभागांचे मिळून 102 अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडणार असून मतदान पक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी दोन झोनल ऑफिसर मतदान केंद्रांना भेटी देऊन संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. अशाप्रकारे एकूण 104 अधिकारी व कर्मचारी निवडणूक मतदान पक्रिया पार पाडतील.

LEAVE A REPLY

*