‘एनडीसीसी’ला मिळणार 178 कोटी; शिखर बँकेला सहकारमंत्र्यांचे आदेश

0

नाशिक : जिल्हा बँकेच्या ठेवींची तसेच अन्य असे मिळून 178 कोटी रक्कम मिळावी म्हणून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत एकदाची बैठक झाली.

बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य बँकेच्या अधिकार्‍यांना जिल्हा बँकेला 178 कोटी देण्याचे आदेश दिले.

त्यामुळे जिल्हा बँकेचा चेंडू पुन्हा राज्य बँकेच्या म्हणजेच शिखर बँकेच्या कोर्टात गेला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, संचालक मंडळातील गुलजार कोकणी, शिरीष कोतवाल आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांसह आमदार आणि बँकेच्या संचालक मंडळाने जिल्हा बँकेची व्यथा मांडली. जिल्हा बँकेची शासनाकडे 546 कोटींची ठेव असून त्यापैकी 300 कोटींची उचल यापूर्वीच घेतलेली आहे. परंतु शासनाकडे असलेल्या ठेवींच्या उर्वरित रकमेतील काही रक्कम मिळावी यासाठी संचालक मंडळाने आग्रह धरला.

सर्व परिस्थिती सहकारमंत्र्यांच्या नजरेस आणून दिल्यानंतर सहकारमंत्र्यांनी दूरध्वनीद्वारे राज्य बँकेच्या अधिकार्‍यांना जिल्हा बँकेला मदत करण्याचे आदेश दिले. याप्रश्नी उद्या मंगळवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्य बँकेकडून कसा प्रतिसाद मिळतो त्यावर बरेच काही अवलंबून आहे.

मुंबईच्या बैठकीत केवळ ठेवींची रक्कम मिळावी यावरच सुमारे अर्धा तास चर्चा झाली. परंतु खरिपासाठी शेतकर्‍यांना कर्जवाटप, बँंकेचे रखडलेले व्यवहार, सभासदांच्या ठेवी याबाबत मात्र कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी पीककर्जाचा प्रश्न तसाच प्रलंबित राहून शेतकर्‍यांवरील संकट कायम राहिले आहे.

याशिवाय खातेदारांचे व्यवहार आदी गोष्टींवर कोणत्याही प्रकारची चर्चा न झाल्याने हा तिढा सुटण्याची चिन्हे धुसर दिसत आहेत.

दरम्यान, यापूर्वीही सहकारमंत्र्यांसमवेत जिल्हा बँक संचालकांची बैठक झाली. या बैठकीत शिखर बँकेच्या अधिकार्‍यांनी जिल्हा बँकेला मदत देण्याचे टाळले. त्यावेळी त्यांनी जिल्हा बँकेने आपल्या थकित कर्जापैकी 100 कोटी वसूल करण्याच्या सूचना देऊन व्यवहार सुरळीत करण्याचा सल्ला दिला होता.

परंतु एकदा नकार दिल्यानंतर पुन्हा मदतीचा चेंडू शिखर बँकेकडे गेल्याने शिखर बँक मदत करणार का? याबाबत उद्या चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

*