राहुरी बैठकीत राष्ट्रवादीचे रंग उडाले

0

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नगण्य उपस्थिती तनपुरे-गाडे एकीही फिकी

राहुरी (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नगरच्या मेळाव्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी राहुरीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. पक्षाची ताकद दाखवण्यासाठी आयोजित या बैठकीत कार्यकर्त्यांच्या मोजक्या उपस्थितीने पक्षाचे रंग उडाल्यासारखी स्थिती झाली. बैठकीत गाडे-तनपुरे गटात सुसंवादाऐवजी विसंवाद नजरेस पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे.

विशेष म्हणजे शक्तीप्रदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आढावा बैठकीला असलेली मोजकी उपस्थिती चर्चेचा विषय झाली आहे. जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना पोहचण्यास उशीर झाल्याने आधीच चुळबुळ झाली होती. त्याचा परिणाम भाषणांवरही दिसला. गाडे यांच्या काही समर्थकांनी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांना अप्रत्यक्षरित्या चिमटे घेतल्याने चर्चा भरकटली. पवार यांच्या नगर दौर्‍यात राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचे पाहू, असे सांगत तनपुरे यांनी विषय आटोपता घेतला. राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये ऐन नगर येथील मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर चलबिचल वाढल्याचे म्हटले जात आहे. बैठकीत केवळ औपचारिक चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष घुले यांनी तालुक्यातील वादावर मौन बाळगणे पसंत केले.

सन 2014 ची विधानसभा निवडणुकीत तनपुरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेकडून लढवली. विधानसभेला अपयश आल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचे शिवसेनेबरोबर बिनसले. त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या राहुरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तनपुरे यांनी जनसेवा मंडळाच्या नावाखाली निवडणूक लढविली. निवडणुकीनंतर तनपुरे यांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यक्रमांना हजेरी लावली होती. मात्र, डॉ. तनपुरे कारखाना व राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीत गाडे व तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांमधील मनोमिलन वरवरचे असल्याचे आता त्यांच्या समर्थकांना वाटू लागले आहे.

राहुरी तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष मजबूत आहे. गाडे-तनपुरे असा कोणतीही वाद नाही. आमच्या समर्थकांनी भाषणात केवळ पीळ काढून निवडणुका लढविल्या तर आपण यशस्वी होऊ,असा आशावाद व्यक्त केला आहे. पवार यांच्या दौर्‍यासाठी तालुक्यातून मोठे शक्तीप्रदर्शन होणार आहे. तनपुरे-गाडे गट एकत्रच राहणार असून बैठक चांगली झाली आहे. जिल्हाध्यक्ष घुले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मौलिक सूचना केल्या आहेेत.
– शिवाजीराव गाडे, जिल्हा परिषद सदस्य.  

LEAVE A REPLY

*