पारनेर राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांनी डागली बंडखोरांवर तोफ : दीपक पवारांवर बडतर्फची कारवाई

0
पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत वाद विकोपाला गेले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादासाहेब पठारे यांनी बंडखोरांवर निशाना साधला आहे. पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार यांना पक्ष विरोधी भूमिकेमुळे बडतर्फ करण्यात आल्याचे पठारे यांनी ‘सार्वमत’ शी बोलताना सांगितले.
चार दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या आदेशाने उपसभापती पवार यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून दीपक पवार यांना खुलासा करण्यास सांगितले होते, परंतु पवार यांनी नोटीस स्वीकारली नाही व खुलासाही केला नाही, ही कारवाई करण्यात आल्याचे पठारे यांनी सांगितले.
पठारे म्हणाले की, अशोक सावंत व विक्रम कळमकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नसून त्यांनी जि.प. व पं.स. निवडणुकीमध्येच बंडखोरी केल्याने व ते पक्षात नसल्याने त्यांना नोटीस पाठवणे व बडतर्फ करण्याचा कोणताही प्रश्नच येत नाही.
निघोज येथे झालेली बैठक ही राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांची नसून ती पक्ष विरोधी कायमच गरळ ओकणार्‍यांची होती, तसेच विरोधकांनी फूस लावून पाठवलेले ते कटकारस्थानी होते. कोण पक्षामध्ये दुकानदारी करत आहे व कोण निष्ठावान आहे हे सावंत यांनी स्वत:ला आरशासमोर उभे करून विचारावे, प्रत्येक वेळेस निवडणुकांमध्ये पक्षाला बदनाम करायचे व आपण पक्षाचे निष्ठावान असल्याचा कांगावा करण्याचा सावंत यांचा धंदा असल्याचा आरोप पठारे यांनी सावंत यांच्यावर केला.
तसेच दीपक पवार यांनी चर्चेविनाच व अनेक वेळा सांगूनही सावंत यांचीच बाजू ओढण्याचा प्रकार केला आहे व त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना बडतर्फ करण्यात आले. उपसभापती पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकांना किती काम करून दिवे लावले असा प्रश्न केला आहे, उलट सुपा ग्रामपंचायत स्वतःहून विरोधकांना देणार्‍यांनी आम्हाला पक्ष निष्ठा शिकवू नये, असा टोला मारला आहे.
तसेच कोअर कमिटी स्थापन करण्यास आपला कोणताही विरोध नसून आपण स्वतः त्यासाठी आग्रही आहोत व अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असल्याचे पठारे यांनी आवर्जून सांगितले आहे.
तालुक्यातील पक्ष नेतृत्वावर आरोप करताना आपण पक्षासाठी काय योगदान दिले हे पहिले सावंत व पवार यांनी तपासावे व नंतरच आरोप करावेत नाहीतर त्यांच्या आरोपांना आपण अजिबात भीक घालणार नसल्याचे व आपल्या कामातून ठणकावून उत्तर देणार असल्याचे पठारे यांनी सांगितले.

योग्य वेळी उत्तरे देवू : झावरे –
आपण पक्षासाठी 24 तास काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता असून पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदार्‍या आपण प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत, तसेच माझ्यावर झालेले आरोप बिनबुडाचे असून त्या आरोपांना आपण अजिबात घाबरत नसून योग्य वेळी सर्व आरोपांना व्यवस्थित उत्तर देऊ, असे झावरे म्हणाले. 

पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील : पवार –
राष्ट्रवादीतून बडतर्फची नोटीस आली नसून अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे ज्यावेळी आपल्याला पक्षामधून अधिकृतपणे काढतील त्याच वेळेस आपण पक्षाचे काम करणे बंद करू, असे पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार म्हणाले. 

पवारांच्या दरबारात 5 दिवसांत लागणार निकाल : सावंत –
शनिवारी (दि.7) रोजी अजितदादा पवार यांची भेट घेतली असून येत्या 4 ते 5 दिवसांत तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. पक्षविरोधाचा आरोप करणार्‍या दादासाहेब पठारे यांनी स्वत:च्या गावातून राष्ट्रवादीला दिलेले योगदान तपासावे. वरीष्ठ पक्षश्रेष्ठी सांगतील तेव्हाच पक्षातून जावू. येत्या 5 दिवसांत पवार साहेबांच्या दरबारात लागणारा निकाल व तोच आदेश आपणास मान्य असणार असल्याचे, अशोक सावंत म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*