नाशिकरोडला अल्पवयीन मुलाची हत्या

0
 नाशिकरोड | दि. २५ प्रतिनिधी-* जेलरोड परिसरातील मंगलमूर्ती नगरमध्ये काल दुपारी चार वाजेच्या दरम्यान एका सोळा वर्षीय मुलाचा २० ते २५ युवकांनी पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. तीन दिवसात खुनाची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुषार भास्कर साबळे (१६), रा. पंचशील नगर, कसारा, असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. तो मूळचा कल्याण येथील रहिवासी असल्याचे समजते. दहावीची परीक्षा संपल्याने येथील मंगलमूर्तीनगर परिसरातील आत्या संगीता भाऊसाहेब जाधव (हर्ष सोसायटी) यांच्याकडे आला होता. या परिसरात तुषार याचा आणखी एक आत्येभाऊ अक्षय राहतो. काल (दि. २५) दुपारी चार वाजेच्या दरम्यान अक्षय व तुषार यांच्यासोबत चार ते पाच मित्र एका बाकावर बसले होते. त्यावेळी एका ओमीनी व्हॅन, अल्टो आणि दुचाकीवर २० ते २५ युवक आरडाओरड करत आले.
त्यांनी हवेत गोळीबार केला. यामुळे बाकावर बसलेला तुषार, अक्षय व त्यांच्या मित्रांनी पळ काढला. या दरम्यान वेगवेगळ्या वाहनांतून आलेल्या टोळक्याने सिनेस्टाईल पाठलाग करून तुषार याला गाठले व त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला जयरामभाई रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढे त्याला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार करणार्‍या डॉक्टरांनी तुषार यास मृत घोषित केले. तुषारची हत्या झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी बिटको रुग्णालयात त्याच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याने परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले होते. वपोनि पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह पोलिसांनी तातडीने बिटको रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, खुनाची माहिती समजल्यानंतर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, उपनगर पोलीस ठाण्याचे वपोनि बाजीराव महाजन आदींसह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दोन ते तीन दिवसांपुर्वीच तुषार आपल्या आत्याकडे जेलरोड येथील मंगलमुर्ती नगर येथे आला होता. या ठिकाणी त्याची कोणाशी जास्त ओळख नसताना त्याची हत्या का करण्यात आली, याबाबत तर्कवितर्क केले जात असून त्याचा आत्येभाऊ अक्षय याच्या माहितीवर तपासाठी पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

*