वाहन तोडफोड प्रकरणी संशयितांची धरपकड

वाल्मिकनगरमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

0
पंचवटी | दि. १६ प्रतिनिधी  पंचवटीतील पाथरवट लेन परिसरात सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ४० ते ५० जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केल्याची घटना झाली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला असून अद्यापपर्यंत पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे पाथरवट लेन परिसरांतील नागरिकांत दहशत निर्माण झाली असून या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. तर दुसरीकडे आज आज दुपारी वाल्मिक नगर परिसरांत पोलिसांनी कोम्ंिबग ऑपरेशन राबवित संशयितांची शोधमोहीम घेतली होती.

पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी अविनाश कौलकर, प्रेमचंद कौलकर, रोहीत कडाळे, रुषीकेश गरड, किरण, गोटू गोसावी यांच्यासह २५ ते ३० संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास या टोळक्याने पाथरवट लेन परिसरांतील विनायक दीपक लाटे उर्फे झगड्या यांच्यासोबत झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरून तलवार, कुर्‍हाडी, कोयते व लोखंडी गज अशी धारधार हत्यारे घेवून परिसरांत शिवीगाळ करीत दहशत निर्माण केली.

तसेच परिसरांतील १० ते १२ वाहनांची तोडफोड केली होती. यानंतर झगड्या यांच्या घरात प्रवेश करून घरातील साहित्याची देखील तोडफोड करून पलायन केले होते. यानंतर परिसरांतील संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन करीत संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काल रात्रीपासून संशयित गुन्हेगारांची शोध मोहीम हाती घेतली आहे. यात ४ ते ५ संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच आज दुपारी वाल्मिक नगर परिसरांत पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, सुभाषचंद्र देशमुख, आनंदा वाघ, उपनिरीक्षक शैलेंद्र म्हात्रे आदी अधिकार्‍यांनी कर्मचारी व राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह परिसरांतील कोम्बिंग ऑपरेशन राबवित गुन्हेगारांची शोध मोहीम हाती घेतली होती.

यावेळी परिसरांतील काही घरांची तपासणी केली. तसेच पाथरवट लेन परिसरांत पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे. पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे.

दोन गटांच्या वादात स्थानिक दहशतीत
वाहन तोडफोड प्रकरणातील प्रमुख संशयित अविनाश कौलकर, प्रेमचंद कौलकर, रोहीत कडाळे, ॠषीकेश गरड, किरण, गोटू गोसावी आणि विनायक दीपक लाटे उर्फे झगड्या यां दोन्ही गटात अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू आहे. यापूर्वी देखील या दोन्ही गटात हाणामार्‍यासारख्या घटना होवून परिसरांत दहशत निर्माण केल्याचे प्रकार झालेले आहेत.

त्यातच काल पाथरवट लेन परिसरांत रात्री ११ वाजता वाहनांची तोडफोड होण्यापूर्वी ठिक अर्धातास आधी वाल्मिकनगर परिसरांत संशयित किरण शेळके, नाग्या, झगड्या, मंगेश आदींनी अविनाश, किरण शिंदे यांच्यासह त्यांच्या साथीदारांना शिवीगाळ, मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी वाल्मिकनगर येथील पार्वताबाई प्रकाश गजमळ या महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या घटनेच्या थोड्याच वेळात वाल्मिकनगरमधील या गटाने पाथरवट लेन परिसरांतील दीपक लाटे उर्फे झगड्या याच्या घरावर हल्ला करीत परिसरांतील वाहनांची तोडफोड करीत दहशत पसरविली होती. या दोन गटांच्या वादात स्थानिक रहिवासी मात्र दहशतीखाली वावरत असून यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

*