समृद्धीप्रकरणी चर्चेतून तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0

नाशिक । दि. 30 प्रतिनिधी

समृध्दी महामार्गासाठी ज्या गावांमधून विरोध होत आहे. त्या गावातील शेतकरयांशी चर्चा करून समन्वयातून तोडगा काढण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गासाठी जमीन संपादन कामास गती देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले.

समृध्दी महामार्गासह राज्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी समृध्दी महामार्ग जमीन संपादनाचाही आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी नाशिक जिल्हयाचा आढावा सादर केला. जिल्हयातील इगतपुरी , सिन्नर या दोन तालुक्यातून जाणार्‍या 101 किलोमीटरच्या महामार्गासाठी 1290.8 हेक्टर जमीनीचे संपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी 1114.4 हे. जमीनीची संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली आहे .

सिन्नर तालुक्यातील ज्या सहा गावांमधून या महामार्गाला विरोध करण्यात येत होता त्यापैकी मर्‍हळ गावातील मोजणी पूर्ण करण्यात आली असून लवकरच उर्वरित पाच गावांचीही मोजणी पूर्ण करण्यात येणार आहे.

सध्या इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने मिळकतींचे मुल्यांकन तसेच पोटहिश्श्याची मोजणी करण्यात अडथळे येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आतापर्यंत जिल्हयात 40 शेतकरयांच्या 30 हेक्टर जमीनीचे संपादन करण्यात आले असून 33 कोटींचा मोबदला शेतकरयांना देण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या कामास गती देण्याचे आदेश दिले. मोजणी बाकी असलेल्या गावांची मोजणी पूर्ण करून थेट खरेदी प्रक्रियेव्दारे जमीन संपादन करा तसेच ज्या गावांतून प्रकल्पाला विरोध होतो आहे. तेथील शेतकर्‍यांशी समन्वय साधून चर्चेतून तोडगा काढण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन , समृध्दी प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी विठठल सोनवणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*