औद्योगिक वसाहतीतील भूखंड अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी वाटप करणार

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी
येवला विधानसभा मतदारसंघातील विंचूर औद्योगिक वसाहत वाईन उद्योगासाठी राखीव आहे. मात्र येथील उर्वरित जागेवर कृषीपूरक उद्योगांना परवानगी देण्याबाबत आ. जयवंत जाधव यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारला होता.

सदर प्रश्नाच्या लेखी उत्तरात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या औद्योगिक वसाहतीतील 40 हेक्टर भूखंड अन्नप्रक्रिया उद्योगकरिता वाटप करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे स्पष्ट केले.

निफाड तालुक्यातील विंचूर येथील एमआयडीसीमध्ये कृषीपूरक व अन्नप्रकिया उद्योग धंद्यासाठी परवानगी मिळण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी केली आहे. या औद्योगिक वसाहतीमधील उर्वरित भूखंड हे कृषीपूरक उद्योगांना देण्यात यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने केली होती. विंचूर ही एमआयडीसी वाईन उद्योगासाठी राखीव आहे.

सदर एमआयडीसीमध्ये फक्त चार वाईन उद्योग सुरू असून जवळजवळ 40 हेक्टर जागा विनावापर पडून आहे. या ठिकाणी वाईन उत्पादनाबरोबरच इतर कृषी उत्पादनांवर आधारित उद्योग व अन्नप्रक्रिया उद्योगांना परवानगी मिळाल्यास त्याचा या परिसरातील शेतकरी व लहान उद्योगधंद्यांना फायदा होईल, अशी भुजबळ आणि जाधव यांची मागणी होती.

निफाड तालुका हा कृषी क्षेत्रात आघाडीवर असून या भागात भाजीपाला व फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे या एमआयडीसीमध्ये कृषीपूरक उद्योगधंद्यांना परवानगी मिळाल्यास शेतकर्‍यांचा मोठा फायदा होईल, असे आ. जाधव यांनी उद्योगमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

त्यानुसार तारांकित प्रश्नाच्या उत्तरात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे, या एमआयडीसीमध्ये कृषीपूरक व अन्नप्रकिया उद्योगधंद्यासाठी परवानगी मिळण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी केली आहे. विंचूर औद्योगिक क्षेत्रामध्ये महामंडळाच्या ताब्यात 133.99 हे आर क्षेत्र असून यामध्ये टप्पा क्र. 1 मधील 18.91 हेक्टर आर, टप्पा क्र.2 मधील 65.08 हे.आर क्षेत्रावरील सर्व भूखंडांचे वाटप करण्यात आलेले आहे.

तसेच टप्पा क्र.3 मध्ये 50 हेक्टर आर क्षेत्र विकसित करण्यात आले असून यामधील 10 हेक्टर क्षेत्र वाईन उद्योगाकरिता वाटप करण्यात आले आहे. उर्वरित 40 हेक्टर आर क्षेत्रामध्ये वाईन उद्योगासाठी मागणी नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार 40 हेक्टर आर क्षेत्रावर वाईन प्रकल्पाशिवाय अन्नप्रकिया उद्योग या प्रकल्पाकरिता भूखंडवाटप करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे विंचूर औद्योगिक वसाहतीमधील शिल्लक भूखंडांवर लवकरच कृषीपूरक उद्योग व उद्योग धंदे निर्माण होणार असून शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव मिळणार आहे. तसेच येथील नागरिकांना रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होणार आहेत.

LEAVE A REPLY

*