नाशिक जिल्ह्यातील पावसामुळेपाणलोट क्षेत्रातील बंधार्‍यांत भर

नाशिक । दि. 16 प्रतिनिधी  पंधरा दिवसांत चारवेळा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गंगापूर, दारणा, चणकापूर, गिरणा, करंजवण आदी मोठ्या धरणांच्या आणि इतर मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात असलेले गावठाण बंधारे, खाचरे, शिवार बंधारे यांच्या जलसाठ्यात भर पडली आहे.

विदर्भ, मराठवाड्यापेक्षा वेगाने नाशिकचे तापमान सरासरी तापमानाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचे कारण म्हणजे नैऋत्य मोसमी वार्‍यांनी आंध्र प्रदेश, हिंदी महासागराची पश्चिम किनारपट्टी व्यापली आहे.

त्यामुळे मान्सूनची आगेकूच होत आहे. नाशिकमध्ये बुधवारी एका तासात सुमारे 92 मिलीमीटर पाऊस झाला. त्याचवेळी जिल्ह्यात कमी-अधिक स्वरुपात पाऊस झाल्याने त्याचा लाभ लहान बंधारे, शेततळ्यांना होऊन त्यांच्या साठ्यात भर पडली आहे.

उन्हाळ्यात मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उन्हाची तीव्रता शिगेला होती. तापमान 38 ते 40 अंशाच्या पुढे कायम राहत असल्याने यंदा प्रखर उन्हाळा होता.

हवेत उन्हाच्या झळा, प्रचंड तापलेले रस्ते आणि हवेतील आर्द्रता घटल्याने नागरिकांना उन्हाळ्यात उकाड्याचा प्रचंड त्रास झाला. नाशिकचा पारा सुमारे 42 अंशाच्या पुढे सरकरल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली होती. तर मालेगावचा पाराही 45 अंशाच्या आसपास जाऊन पोहोचलेला होता. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाची धग प्रचंड होती.

जिल्ह्यात जून महिन्याच्या आरंभी पूर्व भाग असलेल्या नांदगाव, येवला, बागलाण, देवळा, चांदवड या भागात पाऊस झाला होता. तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गारपीट झाली होती. या दोनवेळा झालेल्या पावसाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. चालू आठवड्यात सलग तीनवेळा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. मान्सून स्थिरावल्याने आकाश ढगांनी आच्छादलेले असते. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढली आहेे. पारा सुमारे 30 ते 32 अंशावर जरी असला तरी गार हवेमुळे उकाड्याचा प्रभाव घटला आहे.

काल नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने जमिनीत पाण्याचा निचरा झाला आहे. त्यामुळे जमिनीतील उष्णताही घटली आहे. हवेत आर्द्रता असल्याने हवेतील उकाडाही घटला आहे. तर आकाश ढगांनी आच्छादलेले असल्याने उष्णताही कमी झाली आहे. आज सकाळी नाशिकचे तापमान 26 अंश होते, दुपारी 32 होते तर संध्याकाळी पुन्हा त्यात घट झाली होती.

LEAVE A REPLY

*