दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामपंचायतींना नोटीस

0

नाशिक । दि. 3 प्रतिनिधी – अतिसराच्या आजारात भर घालणार्‍या दूषित पाण्याचा ज्या ग्रामपंचायतींकडून पुरवठा केला जात असेल अशा ग्रामपंचायतींना नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापतींनी प्रशासनाला दिले आहेत.

सभापती यतीन पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची बैठक झाली. त्यावेळी समिती सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी यांचा पदभार काढून घेऊन चौकशी करावी किंवा त्यांच्या बदलीचा प्रस्ताव शासनाला पाठवून द्यावा, अशी मागणी बैठकीत सदस्य हरिदास लोहकरे यांनी केली.

आरोग्य पथक जिल्ह्यात जे काम करीत आहे त्यांचा आढावा असलेले अहवाल सादर केले जावेत. त्याचबरोबर आरोग्य विभागाने कुटुंबनियोजनात पुरुष नसबंदी कार्यक्रम उत्तम राबवल्याने आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश वाघ, डॉ.संदीप वेढे, डॉ. देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला.

बैठकीत अतिसार नियंत्रण कार्यक्रमाचे परिपत्रक वाचून दाखवण्यात आले. तसेच बालकांना स्तनपान कसे गरजेचे आहे, याची माहिती देणारे उपक्रम जिल्ह्यात सप्ताहात राबवले जाणार असल्याचे यावेळी आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्ह्यात ज्या तालुक्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे अशा तालुक्यांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवणार्‍या जनजागृती उपक्रमांची माहिती नागरिकांना द्यावी, असे आरोग्य बैठकीत सभापती पाटील यांनी सूचीत केले.

बागलाण आणि इगतपुरी तालुक्यात सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सभेस अनुपस्थित राहणार्‍या नांदगाव तालुका आरोग्य अधिकार्‍यांना यावेळी नोटीस बजवाण्याचा निर्णय झाला.

तसेच येवला तालुक्यात बदली झालेल्या कर्मचार्‍यांना प्रशासनाने तात्काळ कार्यमुक्त करावे अन्यथा त्यांचे वेतन काढू नये, असे यावेळी सूचीत करण्यात आले.

LEAVE A REPLY

*