विवेक व्याख्यानमाला: डॉ.अजित नवले यांचे आज व्याख्यान

0

नाशिक, दि.19, प्रतिनिधी – डॉ. नरेंद्र दाभोळकर व्याख्यानमालेंतर्गत 42 वे पुष्प म्हणून मंगळवारी किसान सभेचे सरचिटणीस डॉ अजित नवले यांचे शेतकर्‍यांचे प्रश्न आणि स्वामीनाथन् आयोग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या व्याख्यानात ते शेतकरी संपावर का गेला, शेतकर्‍यांची कर्जमाफी म्हणजे काय, सरकारने शेतकर्‍यांकडे का लक्ष दिले पाहिजे, शेतकर्‍यांचे प्रश्न व उत्तरे यांची शाश्वत सांगड काय, हमीभाव, शेतमालाच्या किमती कशा ठरव्याव्यात, देशाच्या विकासात शेतकर्‍यांची खरी भूमिका किती, शहरी ग्राहक व नागरिक आणि शेतकरी यांचा संबंध आदी गोष्टींवर प्रकाश टाकणार आहेत.

सीआयटीयू नाशिक व डॉ. सुधीर फडके वाचनालय या संस्थांनी संयुक्तपणे केले आहे. नाशिकमधील पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांनी डॉ नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. त्या अंतर्गत गेल्या 41 महिन्यांपासून विविध विषयांवर विवेकपूर्ण मांडणी करणारी व्याख्याने नाशिककरांसाठी आयोजित केली जात आहे.

शहरातील शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, मूलभूत हक्क आंदोलन, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन संमिती, नारायण सुर्वे थिंकींग अ‍ॅकेडमी, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास, लोकनिर्णय सामाजिक संघटना, भारत ज्ञान विज्ञान समुदाय आदी संघटना या व्याख्यानाचे यजमानपद घेतात.

या कार्यक्रमात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. डी. एल. कराड, कॉ. तानाजी जायभावे, कॉ. सीताराम ठोंबरे, कॉ. श्रीधर देशपांडे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

*