कांदा उत्पादकांचे पैसे अदा न झाल्यास कारवाई

0

लखमापूर । दि. 1 अशोक थोरात
बँकेत धनादेश न वटलेल्या कांदा उत्पादकांचे पैसे येत्या 15 डिसेंबरअखेर पर्यंत अदा करावेत अन्यथा कडक कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा देत जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी ज्या दिवशी कांदा विकला त्याच दिवसाचा धनादेश उत्पादक शेतकर्‍यांना देण्याचे निर्देश व्यापार्‍यांना दिले आहे.

विकलेल्या कांद्याचे धनादेश बँकेत न वटल्याने संबंधित कांदा उत्पादक शेतकर्‍यानी संबंधित व्यापार्‍यांकडे तक्रार केली असता टाळाटाळ केली जात असल्याने या शेतकर्‍यांनी दै.‘देशदूत’कडे व्यथा मांडल्याने या संदर्भात पणन मंत्री सुभाष देशमुखांचे लक्ष वेधण्यात आले असता जिल्हा उपनिबंधक करे यांना या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश मंत्रालयातून देण्यात आले होते.

या अनुषंगाने उमराणे कृषि उत्पन्न बाजार समितीत करे यांनी बैठक घेत धनादेश न वटलेल्या कांदा उत्पादकांचे पैसे 15 डिसेंबरअखेर पर्यंत अदा करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित व्यापार्‍यांना दिले. या मुदतीत रक्कम अदा न झाल्यास कडक कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

तसेच ज्या दिवशी कांदा विकला आहे त्याच दिवसाचा धनादेश उत्पादकांना देण्याची सुचना व्यापार्‍यांना उपनिबंधक करे यांनी केली. बैठकीस कृउबा चेअरमन राजेंद्र देवरे, सचिव नितीन जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंंडू पंडित देवरे, संचालक विलास देवरे, बाळासाहेब देवरे, धर्मा देवरे, गोरख कचवे, गणेश देवरे, रामदास साळुंके आदींसह कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

बाजार समितीचे सचिव नितीन जाधव यांनी बैठकीत ठरल्यानुसार कांदा व्यापारी संघटनेस पत्र देवून शासन निर्देशाप्रमाणे काम करण्याची सुचना केली असून कांदा ज्या दिवशी विकत घेतला जाईल त्याच दिवसाचा धनादेश उत्पादकांना देण्याची सुचना केली आहे.

बाजार समितीने दिलेल्या पत्रावर उद्या शनिवारी कांदा व्यापारी असोसिएशनची बैठक होत असून या संदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*