येवला मुक्तीभूमी विकास कामांसाठी भुजबळांचा तुरुंगातून पाठपुरावा

0

येवला, ता. ७ :  येवला मुक्तीभूमीवर प्रशिक्षण हॉल, ग्रंथालय, अॅम्पीथिएटर ई. सुविधा साकारण्यासाठी आ. छगन भुजबळांचा सतत पाठपुरावा सुरु असून याबाबत बार्टीने १२.६६ कोटींच्या कामांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याची माहिती भुजबळांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे.

आ. छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार मुक्तीभूमीवर प्रशिक्षण हॉल, ग्रंथालय, अॅम्पीथिएटर,अतिथी निवासस्थान, कर्मचारी निवासस्थान,पाणी पुरवठा व मलनिःसारण व्यवस्था आणि विद्युत जनित्र इ.सुविधांसाठी रक्कम रुपये १२.६६ कोटींच्या कामांचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी छगन भुजबळ प्रयत्नशील आहेत.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथील मुक्तीभूमीवर धर्मांतराची घोषणा केली. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी या नावाने संबोधण्यात येते. दरवर्षी दि.१३ ऑक्टोबर, विजयादशमी व दि.१४ एप्रिल या दिवशी देशभरातून बौध्दबांधव मुक्तीभूमीवर डॉ.बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात.

या दिवशी येवल्यात मोठा जनसागर लोटलेला असतो,शहरातील सर्व रस्ते माणसांनी भरलेले असतात तसेच वर्षभर लाखो पर्यटक आणि बौध्दबांधव येथे भेटी देत असतात. या स्थळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान अतिमहत्वाचे तीर्थस्थळ बनले आहे.

येवला मुक्तीभूमीचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून भुजबळांनी येवला विधानसभेचे आमदार झाल्यानंतर या ठिकाणी विश्वभूषण स्तूप, विपश्यना हॉल, भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी साकारून या भूमीचे सुशोभिकरण केले.

भुजबळांनी सुचविलेले कामे साकार झाल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा मिळणार असल्याचे बाळसाहेब लोखंडे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

*