खडकाळ माळरानावर फुलली शेती

0

नाशिक । दि. 28 प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गाव नाल्यावर साखळी बंधारे बांधल्याने सिंचनासाठी शाश्वत पाणीसाठा निर्माण झाला आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथल्या शेतकर्‍यांनी खडकाळ डोंगरावर कष्टाने जिरायतीचे रूपांतर बागायती शेतीत केले आहे.

सिन्नरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव डोंगरावर वसलेले आहे. अवघ्या काही इंचाच्या मातीच्या थरानंतर इथे खडक लागतो. पाऊस चांगला होऊनही पाणी डोंगरावरून वाहून जात असल्याने पावसाळ्यानंतर टंचाई जाणवत असे. अशा परिस्थितीत केवळ खरीप हंगामात भात किंवा बाजरीचे पीक घेतले जात असे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी गावाला टँकरवर अवलंबून राहावे लागे.

एकात्मिक पाटणलोट विकास कार्यक्रमांतर्गत बंधारा बांधल्याने काही भागात पाण्याची उपलब्धता झाली. मात्र जलयुक्त शिवार योजना राबवण्यास सुरुवात झाल्यानंतर गावाची पाणी समस्या दूर झाली. उपविभागीय अधिकारी महेश पाटील आणि तालुकास्तरीय समितीच्या अधिकर्‍यांनीदेखील वेळोवेळी मार्गदर्शन केले. सरपंच इंदूबाई आव्हाड आणि गणपत सांगळे यांनी योजनेअंतर्गत कामे करण्यासाठी पुढाकार घेतला.

गावात शिवारफेरीद्वारे कामांची निश्चिती करण्यात आली आणि गावाचे ‘वॉटर बजेट’ तयार करण्यात आले. लोकसहभागामुळे कामांना चांगली गती मिळाली. नाल्यातील गाळ काढणे, सिमेंट बंधार्‍याला क्युरिंग करणे आदी विविध कामांत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. आराखड्यानुसार विविध यंत्रणांकडून जलसंवर्धनाची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात आल्याने गाव जलसमृद्ध झाले आहे. गावात मोठ्या प्रमाणात टोमॅटो, मेथी, मिरची, कांदा आदी भाजीपाला आणि डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे.

कृषी पर्यवेक्षक आर.पी.बिन्नर यांनी जलयुक्तच्या कामांना गती देण्याबरोबरच शेतकर्‍यांना पीक पद्धतीबाबत चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नातही वाढ झाली असून शेतमजुरांचे स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे. नोव्हेंबर महिना सुरू असताना नाल्यातील सर्व सिमेंट बंधार्‍यात पाणी भरलेले आहे.

गावात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत सहा शेततळे तयार करण्यात आले असून काही शेतकर्‍यांनी पाण्याची उपलब्धता असल्याने खासगी शेततळे तयार केले आहे. त्यामुळे या गावातून दररोज टोमॅटो व इतर भाजीपाला सिन्नरच्या बाजारात जात आहे. शेतकर्‍यांनी जमीन कसताना केलेल्या कष्टाचा लाभ त्यांना जलयुक्तमुळे मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*