वॉरंटवर लिपिकांनी केल्या न्यायाधिशांच्या सह्या; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

0

नाशिक । दि. 28 प्रतिनिधी
विविध खटल्यांमध्ये आरोपी वा त्याच्या साक्षीदार, पंच यांना न्यायालयाकडून काढण्यात येणार्‍या वॉरंटवर कनिष्ठ लिपिकांनीच परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी जिल्ह्यातील दोन कनिष्ठ लिपीकांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी निलंबित करण्याचे आदेश आज दिले आहेत़

जिल्हा न्यायालयातील कनिष्ठ लिपीक संशयित बी़ बी़ आंधळे व दिंडोरी न्यायालयातील कनिष्ठ लिपीक आऱ बी़ बलसाणे यांचा यामध्ये सामावेश आहे.

न्यायालयात सुरू असलेला दिवाणी दावे व फौजदारी खटल्यात गैरहजर राहणार्‍या फिर्यादी तसेच आरोपीचे साक्षीदार, पंंच यांना न्यायाधीशांकडू वॉरंट काढले जाते़ यापैकी वारंवार वारंट काढूनही गैरहजर राहणार्‍यास गैरजमानती वॉरंटही काढले जाते़ अशा वॉरंटवर या कनिष्ठ लिपिकांनी सह्या केल्याचे समोर आले आहे.

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कनिष्ठ लिपीक आंधळे व बलसाणे या दोघांंची चौकशी केल्यानंतर या दोघांनाही निलंबित करण्याचे आदेश आज दिले़ आहेत.

जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी़ व्ही़ देढीया यांच्या न्यायालयात कनिष्ठ लिपीक संशयित बी़ बी़ आंधळे हा काम पाहतो त्याने न्यायाधीशांचे आदेश व वॉरंटवर परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचे समोर आले़

या प्रमाणेच दिंडोरी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी़ एस़ बोरा यांच्या न्यायालयात काम पाहणारा कनिष्ठ लिपीक आऱ बी़ बलसाणे यांनेही न्यायाधीशांचे आदेश व वॉरंटवर परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचे काही दिवसांपुर्वीच समोर आले होते.

या दोघांची चौकशी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आली. यामध्ये दोघेही दोषी आढळल्याने त्यांना तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश न्या. शिंदे यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

*