विक्रीसाठी आलेले 4 गावठी कट्टे जप्त; दोघा सराईतांच्या आवळल्या मुसक्या

0
नाशिक । शहरात गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघा संशयीतांना म्हसरूळ पोलीसांनी तवलीफाट्यावरील रिक्षा थांब्यासमोर सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गणेश सुदाम शेलार (29, रा. निखिल दुकानाशेजारी, यशोदानगर, मेहरधाम, पेठरोड) व लखन दिलीप कानकाटे (29, रा. राजवाडा, सिद्धार्थनगर, मखमलाबाद, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरुळ पोलीस ठाण्याचे हवालदार येवाजी महाले यांना तवलीफाटा येथे दोघे संशयित गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त खबर मिळाली होती.

सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर व पथकाने तवलीफाट्यावरील रिक्षा थांब्यासमोर सापळा रचला होता.

संशयित गणेश शेलार व लखन कानकाटे हे त्याठिकाणी आले असता, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून चार गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी म्हसरुळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, हवालदार येवाजी महाले, संदीप भांड, प्रशांत वालझाडे, उत्तम पवार, सोमनाथ शार्दूल, निलेश पवार, गणेश रहेरे यांनी पार पाडली. यातील भाजीपाला विक्रेता लखन कानकाटे हा सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्याकडून आणखीही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

*