आंतरराष्ट्रीय दर्जाची शुटींग रेंज हीच बामसरांना श्रद्धांजली !

आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षिका मोनाली गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

0

विशेष प्रतिनिधी

नाशिक, ता. १४ : नाशिकमधून ऑलिंपिक नेमबाज घडविण्यासाठी बाम सरांच्या नावे सातपूर एमआयडीसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची शुटींग रेंज नाशिक महापालिकेने साकारावी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ‍आणि त्यातूनच त्यांचा वारसा पुढे चालविला जाईल अशी हृद्य प्रतिक्रिया भीष्मराज बाम यांची विद्यार्थीनी आणि नेमबाजीमधील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांनी जर्मनी येथून ‘देशदूत’ला दिली.

भीष्मराज बाम यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, ‘बाम सरांनी नेमबाजी मध्ये नाशिक व देशाचे नाव उंचावण्यासाठी आम्हाला जी दूरदृष्टी दिली, ती पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

बामसर म्हणजे असे व्यक्तीमत्व होते की ते प्रत्येक ॲथलिटला त्यांनी नेहमीच मदत केली. भविष्यात आम्हीही याचप्रकारे होतकरू नेमबाजांना मदत करण्याचा प्रयत्न करू. २०२४च्या ऑलिंपिकमध्ये नाशिकची मान नक्कीच उंचावू असा आमचा प्रयत्न राहिल.

नेमबाजांसह विविध खेळाडूंना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून बामसर महापालिकेकडे पाठपुरावा करत राहिले. आधीचे महापालिका आयुक्त गेडाम आणि नंतर आलेले आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सहकार्य केले, पण निवडणुकांमुळे हे काम लांबणीवर पडले. आता मात्र हे काम लवकरात लवकर पूर्ण करणे हीच बाम सरांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही गोऱ्हे म्हणाल्या.

नाशिकमध्ये एक्स एल टार्गेट शुटर्स असोसिएशनची स्थापना दिवंगत भीष्मराज बा यांनीच केली होती. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीसह ऑलिंपिकसाठी येथून नेमबाज घडावेत, हा बाम सरांचा त्यामागचा उद्देश होता.

त्याची शुटिंग रेंज ही सातपूर एमआयडीसीमध्ये आहे. त्या शुटिंग रेंजसाठीही त्यांनी मोठा पाठपुरावा केला होता. आता त्या रेंजला भीष्मराज बाम यांचे नाव देण्यासह तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

जर्मनी येथे सध्या ४८ व्या ग्रँड प्रिक्स लिबरेशन आंतराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा सुरू असून त्यात भारतीय संघाच्या प्रशिक्षक म्हणून नाशिकच्या मोनाली गोऱ्हे गेल्या आहेत. दिवंगत बामसरांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने ८ मे पर्यंत १ सुवर्ण, २ रजत आणि ४ कांस्य पदक मिळवून भारताची मान उंचावली आहे.

 बाम सरांचा वारसा पुढे चालवू

बाम सरांनी माझ्यासारख्या तळागाळातील अनेक खेळाडूंना आत्मबल देवून पुढे आणले आहे. बाम सर आपल्यात नाही अशी कल्पनाही मला करवत नाही. कारण मी मिळवलेल्या सर्व पदकांमध्ये मला दिसत आहेत. सरांनी दिलेले संस्कार, शिकवणीचा वारसा आपण सर्वांनी मिळून पुढे घेवून जाण्यासाठी प्रयत्न करूया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

            – अंजली भागवत, आंतरराष्ट्रीय नेमबाज

LEAVE A REPLY

*