जिल्हा रुग्णालयातील गर्भपात प्रकरणातील अर्भक पोलिसांनी उकरून काढले

0

नाशिक, (प्रतिनिधी) दि. ४ : जिल्हा रुग्णालयात अवैध पद्धतीने स्त्रीजातीच्या अर्भकांचा गर्भपात होत असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणी आज संबंधित अर्भक आढळून आले आहे.

गोदाघाटाच्या दक्षिणेला असलेल्या भद्रकाली स्मशानभूमीत या अर्भकाला दफन करण्यात आले होते.

यासंदर्भात प्राधिकृत केलेल्या समितीसमक्ष आज दुपारी हे उत्खनन करण्यात आले.

या प्रकरणी पूर्वीच सरकारवाडा पोलिस ठाण्यात निलंबित डॉ. वर्षा लहाडे हिच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल असून सध्या ती पोलिस कोठडीत आहे.

याच संदर्भात पुढील तपास करताना या प्रकरणातील एका प्रत्यक्ष साक्षीदाराने पोलिसांना संबंधित माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांसह वैद्यकीय पथक आज संबंधित स्मशानभूमीत दाखल झाले आणि त्यांनी ते अर्भक उकरून काढले असता शवविच्छेदन न करता त्या अर्भकाला दफन केल्याचे निष्पन्न झाले.

सदरहू अर्भक हे पुरुष किंवा स्त्री जातीचे असल्याचे समजले नसून फोरेन्सिक अहवाल आल्यानंतरच ते कळणार आहे.

त्यानंतर हा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे.

दरम्यान या प्रकरणामुळे अवैध गर्भपाताचे मोठे रॅकेट असल्याचा आणि त्यात अनेक जण गुंतले असल्याचा संशय बळकट होण्यास पुष्टी मिळत आहे.

दरम्यान अर्भकाचा संशयास्पद आणि अवैध पद्धतीने गर्भपात केल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाची प्रमुख वर्षा लहाडे हिला निलंबित करून तिच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर फरार झालेल्या डॉ. लहाडे हिने अटकपूर्व जामिन मिळविण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश येणार नाही हे लक्षात आल्याने तिने शरणागती पत्करली होती.

न्यायालयाने पुढील तपासासाठी तिला पोलिस कोठडीत दिल्यानंतर आता एक-एक वास्तव उघडकीस येत आहे. त्यातून डॉ. लहाडेसह तिला मदत करणाऱ्यांपुढील अडचणी वाढणार आहेत.

LEAVE A REPLY

*