वणी बोकडबळी बंदीने अंधश्रद्धेला लगाम अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून निर्णयाचे स्वागत

0
नाशिक | दि. १६ प्रतिनिधी-महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या व साडेतीन पीठापैंकी एक असलेल्या श्री सप्तशृंग देवस्थान ट्रस्टने दसर्‍याच्या दिवशी देवी मंदिराच्या आवारात बोकडाचा बळी देण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. या निर्णयाचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी स्वागत केले आहे. या बंदीने अंधश्रद्धेला मोठा लगाम बसणार असून बोकडबळीची अशी बंदी सर्व राज्यात करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी ‘देशदूत’शी स्पष्ट केले.
 पशूहत्या रोखणे व भाविकांच्या सुरक्षेचे कारण देत ट्रस्टने हा निर्णय घेतला असला तरी बोकडबळीची वर्षानुवर्षांची परंपरा मोडून देवस्थानने सुधारणेच्यादृष्टीने पुढचे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.
सप्तशृंग गडावर दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी एका बोकडाची वाजतगाजत मिरवणूक काढत त्याचा बळी दिला जातो. वर्षानुवर्षे सुरू असलेली ही प्रथा यंदापासून बंद करण्यात येणार आहे.
गडाच्या पायथ्याशी भाविकांकडून वैयक्तिकरित्या दिल्या जात असलेल्या बोकडबळीची प्रथा बंद करण्याबाबतही ट्रस्टकडून प्रबोधन केले जाणार असल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
मागीलावर्षी दसर्‍याच्या दिवशी बोकडबळीदरम्यान मानवंदना देताना हवेत केलेल्या गोळीबारादरम्यान १२ भाविक जखमी झाले होते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा मुद्याला प्राधान्यदेत जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.  यांनी देवस्थान विश्‍वस्त तसेच संस्थांनच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन या प्रकाराला मनाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान या बोकडबळी बंदी बाबत विविध प्रतिक्रिया उमटत असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रशासन व देवस्थानने घेतलल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनीस यासाठी गेली २५ वर्षापंासून झगडत आहे.
प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील वणीसह वडांगळी, दोडी या ठिकाणी अनिसने अनेक प्रयत्न केले. प्रबोधन केले परंतु तरीही पूर्ण बळीची प्रथा बंद होऊ शकली नव्हती.
मात्र प्रबोधनामुळे ४० टक्के नागरीकांचे मतपरिवर्तन झाले होते. तसेच स्थानिक प्रशासनाला बळी देण्याच्या ठिकाणांबाबत योग्य ती खबरदारी, स्वच्छता पाळण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले होते.
सप्तशृंग गडावर सुरक्षा तसेच इतर कारणांनी जरी ही बोकडबळी बंदी झाली असली. तरी  यामुळे मोठ्या प्रमापणात अंधश्रद्धेला आळा बसणार आहे.
बुवा बाबांच्या अर्थकारणावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचेही अनिसने स्पष्ट केले आहे. या ठिकाणी चुकीच्या प्रथांना मूठमाती देणे कधीही योग्य आहे.
गड पायथ्याशी सुरू असलेली पशूहत्येची परंपरा मोडीत काढण्यासाठीही ट्रस्ट तसेच प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
बुवा, बाबांचे अर्थकारण बंद  
मासांहार करणे ही वैयक्तिक बाब आहे. परंतु नवसापोटी बोकडबळी नागरिकांना द्यायला भाग पाडणे व अंधश्रद्धा निर्माण करून त्यांची लूट करणे हे प्रकार यामुळे बंद होतील. आमचे प्रयत्न अपूर्ण पडले होते. परंतु आता प्रशासनानेच निर्णय घेतल्याने आमच्या लढ्याला यश आले आहे. आम्ही जिल्हाधिकारी व देवस्थान ट्रस्टचा सत्कार करणार आहोत. आता अंमलबजावणी करताना पोलिसांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
– कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह अंनिस
ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत  
सप्तशृंग गडावर अंधश्रद्धेपोटी, नवसापोटी दिले जाणारे बळी प्रशासन व देवस्थानच्या या ऐतिहासिक निर्णयाने बंद होणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयाचे अंनिस स्वागत करत आहे. वंडांगळी, दोडी आदी ठिकाणी आमचे प्रयत्न अपूर्ण पडले होते. आता या माध्यमातून अंधश्रद्धांना मूठमाती मिळणार आहे. याचे मोठे समाधान असून देवस्थान ट्रस्टसह आम्ही प्रबोधन करणार आहोत.
– महेंद्र दातरंगे, जिल्हा कार्यवाह अंनिस

LEAVE A REPLY

*