Blog : दारी येता घंटागाडी घणाणा, त्यालाच दिवाळी दसरा म्हणाना ।।

0
जर तुम्ही गंगेवर किंवा मोतीवाला कॉलेज परिसरातील कॅनॉल रोडवर गेलात, तर तुम्हाला त्या ठिकाणी एकएक वेडा फिरताना दिसेल. गंगेवरचा वेडा म्हणत असेल की माझे तप देवाला आवडले नाही, आणि कॅनॉलरोडचा वेडा म्ह्‍णत असेल की माझे नशीबच खराब, नशीबाचा कचरा झाला. काय आहे याचे गुढ?

-पंकज जोशी (digi.edit1@deshdoot.com)

ध्यरात्र उलटली होती. घड्याळात अडीच तरी वाजले असावेत. रस्ते सर्व सुनसान दिसत होते. घरटी दहा रुपये घेऊन गस्त घालणारा गुरखाही निवांत झोपला होता. रस्त्यावर भुंकणारी कुत्रीही शांत झालेली दिसत होती. अंबड त्र्यंबक लिंकरोडवरील सातपूरचा एमआयडीसी परिसरातही शांतता होती.

कार्बन नाका, शिवाजी नगर परिसर दिवसभर गजबजलेला असतो. पण मध्यरात्रीनंतर येथे चिटपाखरूही दिसत नाही.  दुपारच्या उकाड्यानंतर पहाट गारव्याचा आनंद घेत सर्वचजण निद्रादेवीच्या अधीन झालेले होते.

काही काळ असाच गेला असावा आणि अचानक धर्माजी कॉलनीतील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरचा दिवा लागतो. अचानक लागलेला दिवा विचित्र भासतो. दिवा लागल्यानंतर त्या घराच्या खिडकीत एका महिलेची आकृती दिसते.

पाठोपाठ आवाज येतो, ‘ अहो, उठा ना ! …अहो पिंकीचे पप्पा उठा ना, बघा तीन वाजत आले घडाळ्यात. रस्त्यावर कुणीच नाहीये आताच जाऊन या.’

या बायकी आवाजाने ‘पिंकीचे पप्पा दचकून जागे होतात. खरे तर अंबडहून कंपनीतली दुसरी शिफ्ट करून आल्यावर त्यांना जबरदस्त झोप आलेली असते. पण तरीही ते उठतात. नव्हे, त्यांना उठावेच लागते. कारण अशा कामांसाठी मध्यरात्र हीच सुयोग्य संधी असते.

तोंडावर पाणी मारून आणि अंगातल्या पायजमा बनियनवर टीशर्ट अडकवून ते घाईने दरवाजा उघडतात. जिने त्यांना झोपेतून जागे केले, ती पिंकीची मम्मी त्यांच्या हातात एक प्लॅटिकची पिशवी देते. सांभाळून न्या, असे सांगायला ती विसरत नाही.

पिंकीचे पप्पा ती पिशवी मोटरसायकलच्या हॅडलला अडकवून धर्माजी कॉलनीतून डाव्या हाताला बारदान फाट्याकडे कुच करतात.

पाचच मिनिटात शांततेला चिरत त्यांची मोटरसायकल मोतीवाला कॉलेजच्या गेटजवळ येते. तेथील एटीएम बाहेरचा सिक्युरिटी झोपला असल्याचे त्यांना दिसते. पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात. थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला कॅनॉल रोडकडे ते वळतात. या रस्त्यावर एरवी दिवसाही वर्दळ कमी असते. आता तर तो किती भयाण असेल त्याची कल्पनाच करायला नको.

कॅनॉल रोडने पुढे सोमेश्वर आणि गणेशनगरला जाणाऱ्या चौफुलीवर अलिकडच्या अंधारात ते थांबतात तेव्हा ते प्रचंड घाबरलेले असतात. त्यांच्या कपड्यावर घामाच्या धारा वाहत असतात. आपल्याला कुणी पाहिले तर नाही ना ही भावना त्यांच्या मनात घर करून असते. मग ते हळूच इकडे तिकडे पाहतात; जवळची पिशवी तेथील एका अंधाऱ्या जागी अलगद ठेवून देतात.

पण इथेच घात होतो. रस्त्यापलिकडच्या शेतात असलेल्या एका झोपडीतील शेतमजूर नेमका त्याचवेळेस विहिरीवरची मोटर चालू करायला उठलेला असतो. पिंकीच्या बाबांनी अलगद ठेवलेल्या पिशवीत त्याचे लक्ष जातेच. अर्थात याची कुणकुण पिंकीच्या बाबांना काही लागत नाही. ते पटकन मोटरसायकल घराकडे वळवतात.

वाटेत त्यांना आणखी सात-आठ जण स्कूटरवर पिशव्या घेऊन त्याच रस्त्याने येत असल्याचे दिसते, पण ते तिकडे साफ दुर्लक्ष करून थेट घरी जातात. तेव्हा अशा सुनसान वेळी आपल्या नवऱ्याने ही महत्त्वाची कामगिरी पार पाडली याचे कौतुक त्यांच्या बायकोच्या म्हणजेच पिंकीच्या आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत असल्याचे त्यांना दिसते. या कामाचे बक्षीस म्हणून तिने प्रेमाने केलेला मसाला चहा पिऊन ते निवांत झोपी जातात.

*****

साधारणत: त्याच वेळेस गोदाघाटाचा परिसरही शांततेत बुडालेला असतो. वर्षभर इथे यात्रेकरू येत असतात, त्यामुळे भल्या पहाटेच गंगाघाटाला जाग येते. पण तरीही उत्तररात्री तीनच्या सुमारास येथेही निरव शांतता असते.

यशवंत महाराज पटांगण, गौरी पटांगण, सानेगुरुजी पटांगण, गाडगेमहाराज पूलाची खालची बाजू अशा काही ठिकाणी बेघर श्रमिकांसोबत, भिकारी आणि काही गूढ बैराग्यांचा हमखास मुक्का असतो.

बरोबर साडेतीनच्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या खंडोबा मंदिराच्या बाहेर झोपलेला एक बैरागी गुढ पद्धतीने उठतो. समोरच असलेल्या गोदामाईला मनोभावे नमस्कार करतो. गंगेच्या पाण्याचे आचमन करून आपल्या तारवटलेल्या डोळ्यांनी गाडगेमहाराज पुलाच्या दिशेने चालू लागतो. अध्यात्माचे वेड असलेला हा बैरागी गेल्या ३ कुंभमेळ्यांपासून इथेच गंगेवर गुढ योगाची साधना करत असतो. त्याची तीन तपं पूर्ण झालेली असतात. अपेक्षेप्रमाणे त्याला कुठल्याही क्षणी दैवी फळप्राप्ती होणार असते.

नेहमीप्रमाणे तो गाडगेमहाराज पुलाखाली असलेल्या म्हसोबाच्या शेडजवळ पद्‌मासनात बसतो. दोन्ही हात जोडून आकाशाच्या दिशेने काहीतरी मागतोय या अर्थाने पसरून ठेवण्याची त्याची लकब असते. जेमतेम पाचेक मिनिटे होत नाहीत, तोच त्याच्या हाताला जोरदार झटका बसतो. कुणीतरी जोरात वजन हातावर टाकावे तसा तो झटका असतो.

बैरागी डोळे उघडतो, तेव्हा हातावर एक गाठ बांधलेली काळी प्लॅटिकची पिशवी पडल्याचे त्याला दिसते. मनोमन तो खूश होतो. नाशिकच्या पुण्यनगरीतील गोदाकाठची त्याची तीन तपांची तपश्चर्या आणि तीन कुंभमेळ्यांच्या पर्वण्यांचे स्नान सफल झालेले असते. काळ्या पिशवीच्या रुपाने देवाने त्याला आशीर्वाद दिला असे त्याला वाटते.

मात्र गुढ साधनेच्या नियमाप्रमाणे सूर्योदयानंतरच या पिशवीचे प्रासादिक दर्शन करण्याचे तो ठरवतो आणि त्या दैवी पिशवीसह पुन्हा खंडोबा मंदिरासमोर असलेल्या पडक्या मंदिराबाहेर अंग टाकतो. आज त्याला कितीतरी वर्षांनी ही समाधीतुल्य निद्रा लागलेली असते. आयुष्य सफल झाल्याचे तेज झोपेतही त्याच्या चेहऱ्यावर झळकत असते.

काही तासांतच सूर्योदय होतो. रामकुंडावर स्नान करणाऱ्यांची गर्दी वाढू लागते. बाजूलाच असलेल्या चहाच्या टपऱ्या गर्दीने फुलतात. फुलबाजार आणि सरकारवाडा परिसरात प्रसन्न मुद्रेने फुले घेण्यासाठी नाशिककर गर्दी करतात. भद्रकाली परिसरातील भाजीबाजाराला सुरुवात होते.

भद्रकाली मंदिरातील घंटानाद सुरू झालेला असतो. बुधा हलवायाच्या दुकानातील जिलेबीची भट्टी तापलेली असते. पांडे मिठाईच्या बाहेर कढईत मसाला दूध उकळत असते. निमाणी बसस्टँडवरून बसच्या फेऱ्या सुरू होतात. गोल्फक्लब, यशवंत व्यायामशाळा, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर व्यायामपटूंची गर्दी वाढलेली असते. एकूणच सकाळच्या प्रहरी नाशिक मस्तपैकी फुललेले दिसते.

कॅनॉल रोडला सोमेश्वर चौफुलीलगत असलेला शेतमजुरही जागा झालेला असतो आणि इकडे गंगेवरचा तपस्वी बैराग्याची समाधीही लोप पावलेली असते. दोघांनाही आता एकच ध्यास असतो. तो म्हणजे पहाटेच्या पिशवीचा. बैरागी पुन्हा सूर्यदेवतेची आराधना करतो. अर्ध्य देऊन उशाशी ठेवलेली पिशवी मनोभावे डोक्याला लावतो. डोळे मिटून मंत्र पुटपुटत तो पिशवीची गाठ सोडतो आणि एक उग्र दर्प त्याच्या नाकात शिरतो. आपल्या तपश्चर्येचे फळ इतके उग्र असेल? असा विचार करून डोळे उघडतो तोच त्याला मोठा धक्का बसतो आणि एका झटक्यासरशी पिशवी लांब फेकतो. अतिशय घाण असा कचरा त्या पिशवीत असतो. आपली तपश्चर्या दैवाला मान्य नाही का? तिचे फळ म्हणून ही घाण माझ्या वाट्याला यावी ना, असा विचार करून थोड्याच वेळात तो वेड्यासारखा भटकायला लागतो.

तिकडे शेतमजूर उत्सुकतेने पिशवी फेकलेल्या जागी गेल्यानंतर तोही अगदी वेडापिसा होऊन जातो. आधी मोठमोठ्याने हसतो आणि नंतर रडतो. कारण तिथे सर्व पिशव्यांमध्ये कचरा भरलेला असतो.

***

जर तुम्ही गंगेवर किंवा मोतीवाला कॉलेज परिसरातील कॅनॉल रोडवर गेलात, तर तुम्हाला त्या ठिकाणी एकएक वेडा फिरताना दिसेल. गंगेवरचा वेडा म्हणत असेल की माझे तप देवाला आवडले नाही, आणि कॅनॉलरोडचा वेडा म्ह्‍णत असेल की माझे नशीबच खराब, नशीबाचा कचरा झाला.

****

अगदी काही दिवसांपूर्वी घडलेली या दोघांबद्दलची कहाणी काही नाशिककरांना माहीत आहे. पण ते त्यांना दोष देत नाहीत, तर महापालिकेत बहुमताने नव्याने सत्तेवर आलेल्या नगरसेवक, आरोग्य अधिकारी, घंटागाडीचे ठेकेदार यांना दोष देतात. गेल्या काही दिवसांपासून घंटा गाड्या फिरकेनाशा झाल्याने कचरा कुठे टाकावा असा नाशिककरांना प्रश्न पडला. त्यातून काही हुशार नाशिककरांनी वेगळाच मार्ग शोधून काढला. त्याचा फटका मात्र वेड लागलेल्या बैरागी आणि शेतमजुराला बसला. काही देवभोळे नाशिककर या वेड्यांना  म्हणतात, आता तुम्ही घंटागाडीचा जप करा म्हणजे पुन्हा पूर्वीसारखे व्हाल. तुम्हालाही करायचाय का घंटागाडीचा जप, मंत्र पुढे दिलेला आहे.

घणणन घणणन वाजे घंटा

कचरा टाकण्या चाले तंटा ।।

दारी येता घंटागाडी घणाणा ।

त्यालाच दिवाळी दसरा म्हणाना ।।

(तळटीप : धर्माजी कॉलनीतले पिंकीचे पप्पा आणि त्यांच्या परिसरातील मंडळी अजूनही मध्यरात्री गुढ वातावरणात कॅनॉल रोडला पिशवी ठेवायला जात असतात. त्या जागेचा दिवसा उजेडी घेतलेला हा खरा फोटो वर दिलेला आहे.)

 

LEAVE A REPLY

*