नाशिक जिल्हा परिषदेला जिल्हा बँकेकडून मिळणार टप्प्या-टप्प्याने पैसे

0
नाशिक । जिल्हा बँकेने आर्थिक घडू सुधारण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामूळे जिल्हा परिषदेला बँकेकडून घेणे असलेले 170 कोटी रुपये टप्प्या- टप्प्याने देण्याचा शब्द जिल्हा परिषदेला दिला आहे.

जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिखर बँकेचे अधिकारी शासनाने नियुक्त केले आहे. बँकेचा पदभार या अधिकार्‍यांनी घेतल्यावर जिल्हा परिषदेने जिल्हा बँकेत अडकलेल्या रकमेचा पाठपुरावा करण्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट नुकतीच घेतली.

त्यात जि.प.च्या 170 कोटी रुपये बँकेकडून परत करण्याची हमी अध्यक्षांनी जून अखेर पर्यंत दिलेली होती. याची आठवण बँकेला करून देण्यात आली. मात्र बँकेची अद्याप वसूली झालेली नाही. तसेच रकम जमा होण्याचे इतर स्त्रोतही बंद असल्याने जिल्हा परिषदेला जिल्हा बँक पैसे टप्प्या-टप्प्याने परत करेल, असे आश्वासन बँकेचे सीईओ राजेंद्र बकाल यांनी दिले आहे.

जिल्हा बँकेने तत्कालीन परिस्थितीत जिल्हा परिषदेचे विविध लेखाशिर्ष अंतर्गत खात्यांवर जमा झालेले पैसे बँकेचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापरले होते. वापरलेली रकम सुमारे 170 कोटी रुपये एवढी आहे. जि.प.ने या रकमेला गृहीत धरून योजना, लाभार्थी आणि ठेकेदारांना जिल्हा बँकेचे धनादेश दिलेले होते.

हे धनादेश जिल्हा बँकेतून वठत नसल्याने जिल्हा परिषदेला संबंधीतांनी विचारणा केली होती. ठेकेदारांनी तर जिल्हा परिषद लेखा विभाग आणि जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक घेत पैसे मिळवण्याची कैफियत मांडली होती. त्यामूळे जिल्हा बँकेकडून पैसे वसूल करण्यासाठी जिल्हा परिषदेने बँकेला पत्र पाठवून जून महिन्याच्या अखेर पर्यंत पैसे देण्याचे आदेश दिले होते.

मात्र, अद्यापही जिल्हा बँकेच्या तिजोरीत खडखडात असल्याने दिलेली मुदत संपण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी जिल्हा बँक सीईओंची भेट धेऊन पाठपुरावा केला. त्यात वस्तुस्थितीला अनुसरुन जिल्हा बँक अर्थस्थिती सुधारत असल्याचे आणि बँकेकडून जिल्हा परिषदेला पैसे परत करण्याची खात्री झाल्याने जिल्हा परिषदेने टप्प्याने पैसे स्विकारण्याची तयारी दर्शवल्याचे कळते.

जिल्हा बँकेने पैसे अडकवल्याने काही दिवसापूर्वीचे जिल्हा परिषदेने शिक्षकांचे वेतन खाते राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळवले आहे. तसेच कोषागारातून मिळणार्‍या रकमेसाठी सरकारी बँकांमध्ये खाते उघडले आहे. त्यामूळे जिल्हा बँकेला सर्वाधिक कमीशन देणारा जिल्हा परिषद ही खातेदार संस्था बँकेपासून हिरावली गेली आहे. हे चुकीच्या नियोजनामूळे झाल्याचे जिल्हा बँकेच्या प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामूळे खातेदार हिरावले जाणार नाही, अशी सुधारणा करणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*