खून प्रकरणात भाजप नगरसेवक शेट्टी गजाआड

0

पंचवटी । दि. 27 प्रतिनिधी

पंचवटीतील संजयनगर परिसरातून सुमारे दीड वर्षापूर्वी 23 वर्षीय तरुण गायब झाल्यानंतर त्यांची हत्या झाल्याचा पंचवटी पोलीसांना संशय होता.

दरम्यान या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी भाजप नगरसेवक हेमंत (अण्णा) शेट्टी यांच्यासह 6 संशयितांवर खूनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला आहे.

दरम्यान भाजप नगरसेवक शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पूर्व विधानसभा मतदार संघाचे आ. बाळासाहेब सानप यांचे हेमंत शेट्टी कट्टर समर्थक असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तळात खळबळ उडाली आहे. दरम्यान शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर समर्थकांनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केल्याचे चित्र होते.

पंचवटीतील जालिंदर उर्फे ज्वाल्या अंबादास उगलमुगले (वय 23, रा.संजयनगर, पंचवटी) हा 1 आक्टोबर 2015 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घरातून गायब झाल्यानंतर त्याचा शोध लागत नव्हता.

दरम्यान त्यावेळी जालिंदरच्या घरच्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करून तत्कालीन पोलीस निरिक्षकांची भेट घेवून या प्रकरणात ज्वाल्या यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत तपास करण्याची अनेकवेळा विनंती केली होती.

मात्र तत्कालीन पोलीस निरिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र ज्वाल्या यांच्या घरच्यांनी या घटनेचा पाठपुरावा सुरुच ठेवला. दरम्यान पंचवटी पोलीस ठाण्याच्या कार्यभार पोलीस निरिक्षक दिनेश बर्डेकर यांनी हातात घेतल्यानंतर या प्रकरणात खासकरून लक्ष घातले होते.

मध्यंतरीच्या कालावधीत महापालीका निवडणूक व इतर बंदोबस्त दरम्यान याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र या प्रकरणाचा बर्डेकर यांना विसर पडला नव्हता. यानंतर पुन्हा या प्रकरणात त्यांनी लक्ष घालून पोलीस ठाण्यातील काही अधिकार्‍यांना याबाबत तपासाची दिशा दाखवली. यातच गत आठवड्यात पोलीस निरिक्षक बर्डेकर सुट्टीवर गेले तरी देखील पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु होता.

दरम्यान गत आठवड्यात पाथरवट लेन परिसरांत पुर्ववैमण्यसातून वाहनांची तोडफोड झाल्याची घटना झाली. यात पालिसांनी अविनाश कौलकर व रोहित कडाळे (रा. संजयनगर, पंचवटी) यांना अटक केली.

यात चौकशी सुरु असताना ज्वाल्याचे अपहरण व हत्येच्या कटात देखील त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची कसून चौकशी केली असता या कटात सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, शाम महाजन, कुंदन परदेशी हे देखील सहभागी असल्याचे उघड झाले.

यानंतर पोलिसांनी ज्वाल्या उर्फे जालींदर याची हत्या का करण्यात आली याची पुन्हा एकदा चौकशी करीत यात अजून काही व्यक्तींचा सहभाग आहे का याची चौकशी केली असता ज्वाल्याची हत्या भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या सांगण्यावरून झाल्याचा खूलाचा झाला. दरम्यान या प्रकरणात आज सायंकाळी हेमंत शेट्टी यांची चौकशी सुरु होती.

यानंतर या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे प्रथम दर्शनी चौकशीत निष्पन्न झाल्याने पंचवटी पोलिसांनी त्यांच्यावर रात्री खूनाच्या गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणात पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, कैलास वाघ यांच्यासह गुन्हेशोध पथकाच्या कर्मचार्‍यांनी तपास केला.

गोपनिय माहितीच्या आधारे उलगडा

पंचवटी पोलीस ठाण्यात जालींदर (ज्वाल्या) उगलमुगले हरवल्याची दिड वर्षापूर्वी नोंद झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना गोपनिय माहिती मिळाल्यानंतर त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा उलगडा झाला. नगरसेवक हेमंत शेट्टी याच्या बरोबर भांडण झाल्यानंतर ज्वाल्याने शेट्टी याचा अपमान केला होता. याचा राग मनात धरून संशयीतांनी शेट्टी याच्या सांगण्यावरून ज्वाल्याची निर्घून हत्या करून पुरावा नष्ट करण्याचे प्रथम दर्शनी उघड होत असून त्यावरून पंचवटी पोलीस ठाण्यात नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– लक्ष्मीकांत पाटील,पोलीस उपायुक्त

LEAVE A REPLY

*