शहाद्यातील भाजपा नेता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात !

jalgaon-digital
2 Min Read

नंदुरबार  – 

शहादा तालुक्यातील भाजपाचा एक नेता लवकरच काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या नेत्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा प्रभारी उमेश पाटील तसेच काँग्रेसचे आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी यांची भेट घेतल्याचे समजते. त्यामुळे हा नेता नेमका कोणत्या पक्षात प्रवेश करतो, हे लवकरच समजणार आहे.

शहादा तालुक्यात भाजपात तीन नेत्यांचे वेगवेगळे गट आहेत. तसेच भाजपा पदाधिकार्‍यांचेही दोन गट आहेत. ही गटबाजी नेहमीच पहायला मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतदेखील ही गटबाजी पहायला मिळाली.

हे तीनही नेते जिल्हयातील नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. यात त्यांच्यात वर्चस्वाची लढाई पहायला मिळते. या वर्चस्वाच्या लढाईमुळे आता या तीनपैकी एका गटातील नेता भाजपातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.

प्रत्यक्षात या नेत्याकडे भाजपाचे कुठलेही पद नाही किंवा त्याने भाजपात प्रवेशही केलेला नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या लोेकसभा, विधानसभा निवडणुकीत या नेत्याने आ.डॉ.विजयकुमार गावित, खा.डॉ.हीना गावित यांचा एकनिष्ठपणे प्रचार केला होता.

त्यावेळी गावितांच्या सोबत नसणारे आता त्यांच्याजवळ येवू लागले आहेत. त्यांच्याकडून नेत्यांचे  कान भरविण्याचे काम सुरु असल्याने या नेत्याला  डावलण्याचा प्रयत्न सुरु असल्याने त्यांना मनस्ताप झाला आहे.

भाजपात झालेल्या इनकमिंगमुळे नेत्यांची गर्दी वाढली आहे. परंतू या इनकमिंगमुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले आहे. त्यामुळे हा नेता आता भाजपातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आला आहे. या नेत्याने 4 डिसेंबर रेाजी मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलावलेल्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या बैठकीवेळी उपस्थित दिली होती.

तसेच दि.10 डिसेंबरला त्याने काँग्रेसचे नेते आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी यांची नंदुरबार येथे भेट घेतली आहे. तसेच आज दि.13 डिसेंबर रोजी त्याने नंदुरबारातच राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी उमेश पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते नेमके कोणत्या पक्षात जातात, याकडे आता लक्ष लागून आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या नेत्याचा इतर पक्षातील प्रवेश परिणामकारक ठरणार आहे. त्यातच सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे नव्याने गटांचे आरक्षण निघाल्यास सर्वसाधारण तसेच ओबीसी संवर्गाच्या जागा वाढणार असल्याने या नेत्याचा इतर पक्षातील प्रवेश महत्वपूर्ण ठरणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *