कापूस जगविण्यासाठी चुहा पद्धतीचा अवलंब

0
शहादा । दि.26 । ता.प्र.-तालुक्यात मृग नक्षत्रात झालेल्या एक-दोन पावसानंतर 16 टक्के पेरणी करण्यात आली आहे. यात शेतकर्‍यांनी कापूस लागवडीवर भर दिला आहे.
मात्र, गेल्या 15 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांना कापूस जगविण्यासाठी चुहा पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. कापूस व इतर खरीप पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना सुरुवातीलाच कसरत करावी लागत आहे.
शहादा तालुक्यात 10 जून रोजी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सद्यस्थितीत कापसाचे अंकुर बाहेर आले असून मात्र दहा-बारा दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने पीक जगविण्यासाठी सुरूवातीलाच शेतकर्‍यांना कसरत करावी लागत आहे.

भूजल पातळीत घट, वीजेची समस्या यासह पाऊस नसल्याने लागवड केलेल्या कापूस जगविण्यासाठी मजूरांच्या सहाय्याने कापसाच्या अंकुराला चुवा पद्धतीने पाणी देण्यात येत आहे.

परिसरातील सर्वच नदी-नाले अद्याप कोरडे आहेत. धरणेदेखील पाणी कमी आणि गाळाने अधिक भरले आहेत. त्यामुळे तलावातील पाणी पातळी दिवसेंदिवस खालावून त्याचा शेतकर्‍यांना अडचणींना सामना करावा लागत आहे.

विहिरी व कुपनलिकांची पातळी सुमारे पाचशे ते सहाशे फुट खाली गेली आहे.

तालुक्यातील बागायतदार शेतकर्‍यांनी पावसाच्या भरवश्यावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापसाची लागवड केली आहे.

मात्र, कुपनलिका व विहिरींचे पाणी कमी झाल्याने व पावसाने गेल्या 10 दिवसापासून दडी मारल्याने पिकांना पाणी देणे अवघड बनले आहे.

त्यातच वीज वितरण कंपनी भारनियमन करीत असल्याने शेतकर्‍यांपुढे संकट उभे ठाकले आहे. ज्या शेतकर्‍यांनी कापूस लागवड केली नाही त्यांनी अद्याप घाई करू नये, जिरायती कापूस लागवड जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

LEAVE A REPLY

*