शहाद्यात कृषी विभागातर्फे भरारी पथकाची स्थापना

0
बामखेडा ता.शहादा । दि.21 । वार्ताहर-खते, बी-बियाणे तसेच किटकनाशकांमध्ये शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून लूट होऊ नये यासाठी शहादा तालुक्यात भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
या पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील कृषीनिविष्ठांमध्ये शेतकर्‍यांनी फसवणूक होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

येत्या दोन-चार दिवसानंतर बाजारात खते, बियाणे व किटकनाशकांच्या खदेरीसाठी शेतकर्‍यांची गर्दी होणार आहे. त्यामुळे कृषी केंद्र संचालकांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये.

तसेच बियाणे व खताच्या साठेबाजीला आवर घालण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. तालुक्यात 225 कृषी सेवा केंद्रे आहेत.

या सर्व दुकानदारांना आवश्यक त्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. कोणत्याही दुकानदाराने बियाणे तसेच खतांची साठेबाजी करू नये.

बोगस कंपन्यांचे बियाणे विकू नये, मालाचा साठा व त्यांचे दरपत्रक असलेला फलक, विक्री परवाना दुकानाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही दुकानदाराकडून नियमांची पायमल्ली झाल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पंचायत समितीचे कृषी अधिकारी ए.जी. कांगणे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना काही अडचण असल्यास किंवा त्यांची खते, बियाणे व औषधांच्या खरेदीत कोणाकडूनही लूट होत असल्यास भरारी पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा.

भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. भोर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी ए.जी. कांगणे, वजनमापे निरीक्षक आदींचा समावेश आहे.

42 नमुने तपासणी
दरम्यान, श्री.कांगणे यांनी तालुक्यातील विविध कृषी केंद्रांमधून कपाशीची वेगवेगळ्या कंपनीची 42 नमुने घेवून ‘बी’ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

त्यात उगवणशक्ती, नॉन बी.टी. टेस्ट, बी.टी. टेस्ट, यासह विविध बाबी तपासून लागवडीयोग्य आहेत का या बाबीही तपासल्या जाणार आहेत.

तसेच राशी कंपनीच्या 659 या वाणाला शासनाने विक्रीस बंदी घातली आहे. त्यात विविध दुकानांची तपासणी करून 472 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. शेतकर्‍यांनी बियाण्यांची खरेदी करतांना एका विशिष्ट वाणाचाच हट्ट करू नये.

इतरही वाणांचे बियाणे खरेदी करून त्यांची पेरणी करावी. बियाण्यांची पक्की पावती घ्यावी. तसेच बॅगेचे सील जपून ठेवावे. कोणताही दुकानदार चढ्या भावाने विक्री करत असल्यास त्याची माहिती भरारी पथकाला द्यावी असे आवाहन श्री.कांगणे यांनी केली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*