66 हजाराच्या व्हीस्कीसह कार जप्त

0

शहादा । दि.12 । ता.प्र.-खेतीया (मध्यप्रदेश) येथून बेकायदेशीररित्या उधना (सुरत) गुजरात राज्यात मद्याची वाहतूक करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ पकडले.

त्यांच्या ताब्यातून 3 लाख रूपये किंमतीच्या स्विप्ट डिझायरसह 66 हजार 500 किंमतीचे विदेशी मद्य असा एकुण 3 लाख 66 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दोघांना दि.16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

खेतिया येथून गुजरात राज्यात मद्याची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त खबर मिळाल्यानंतर येथील डोंगरगाव रस्त्यावरील भाऊ तात्या पेट्रोल पंपानजीकच्या चौफुलीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, हवालदार विकास अजगे, भटु धनगर यांच्या पथकाने सापळा रचला.

मध्यरात्री 2.45 वाजे सुमारास पांढर्‍या रंगाची मारूती कंपनीची स्विप्ट डिझायर कार (क्र.जी.जे.5- सी.एन. 6414) ही संशयीत गाडी येतांना आढळून आली.

तिला पथकाने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वेग वाढवला. यावेळी सिनेस्टाईल पाठलाग करून पोलीसांनी गाडी अडवली असता त्यात 66 हजार 500 रूपये किमतीच्या बॉम्बे स्पेशल विस्कीचे बॉक्स आढळून आले.

मध्यप्रदेशातील बनावट व्हिस्कीचे बॉक्स होते. याबाबत शहादा पोलीसात हवालदार विकास अजगे यांच्या फिर्यादीवरून कैलास जनार्दन कोळी (23) व विलास राजू खंदारे रा.उधना (सुरत) या दोघांना अटक केली.

त्यांना न्यायालयात हजर केले असता, 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मध्यप्रदेश राज्यातून मद्याची तस्करी गुजराथ राज्यात होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या तरीदेखील राज्य उत्पादन शुल्काने याकडे गांभीर्याने खबरदारी बाळगलेली नाही.

परिणामी दररोज लाखो लिटर बनावट मद्याची तस्करी शहादा तालुक्यातून होत असते. या तस्करीत व तस्करांचा कायमस्वरूपी मुसक्या आवळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*